ब्रिटनमध्ये ऋषी सुनक पंतप्रधान लिज ट्रस यांचा पराभव करतील ! – सर्वेक्षण

ऋषी सुनक (डावीकडे) आणि पंतप्रधान लिज ट्रस

लंडन – जर आता ब्रिटनधील ‘हुजूर पक्षा’ची (‘कन्झर्वेटिव्ह पार्टी’ची) नेतृत्वासाठी निवडणूक झाली, तर भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक हे पंतप्रधान लिज ट्रस यांचा पराभव करतील, असे ‘यू गोव्ह’ या प्रसिद्ध जागतिक संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. या सर्वेक्षणानुसार ५५ टक्के पक्षाचे सदस्य हे ४२ वर्षीय सुनक यांच्या बाजूने मत देतील, तर केवळ २५ टक्के सदस्य हे ट्रस यांना निवडतील. ट्रस यांनी अनेक सूत्रांवर कोलांटउड्या घेतल्याने पक्षाचे सदस्य नाराज असून ५५ टक्के सदस्यांना सप्टेंबर मासात ट्रस यांच्या नावाने मतदान केल्याविषयी दु:ख होत असल्याचे हे सर्वेक्षण सांगते.

१. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या नावाला सर्वाधिक पसंती असून ३२ टक्के सदस्य त्यांच्या नावाला अनुमोदन देत असून २३ टक्के सदस्यांचे सुनक यांच्याविषयी सकारात्मक मत आहे.

२. ८३ टक्के सदस्य हे ट्रस यांच्या कामगिरीवर नाराज आहेत. यांमध्ये ७२ टक्के सदस्य असे आहेत, ज्यांनी गेल्या मासात ट्रस यांना मत दिले होते.

३. ‘१९२२ कमिटी नियमां’नुसार ट्रस या किमान १२ मास तरी पंतप्रधानपदी रहातील, असे सांगण्यात येत आहे; परंतु सत्तेची सूत्रे हातात घेतल्यानंतर काही आठवड्यांतच अर्थव्यवस्थेच्या संदर्भात त्यांनी घेतलेल्या विवादास्पद निर्णयांमुळे त्यांना पक्षांतर्गत विरोधाला सामोरे जावे लागत आहे.