Diwali : दिवाळीला विदेशी चॉकलेट नको, तर भारतीय मिठाईच चांगली !

१. भारतात हिंदु सणांच्या वेळी विदेशी चॉकलेटची विज्ञापने प्रसारित करण्यात येणे

‘सणांचा देश समजल्या जाणार्‍या भारतात एखादाच भाग असा असेल की, जेथे मिठाई सिद्ध होत नसेल; मात्र काही वर्षांपासून भारतात हिंदूंच्या सणांच्या वेळी मिठाईच्या नावावर चॉकलेटची विज्ञापने प्रसारित केली जातात. त्यामुळे ‘बॉयकॉट बॉलीवूड (बॉलीवूड बहिष्कृत करा !)’प्रमाणे यांच्या विरुद्धही कारवाई करण्याची वेळ आली आहे. बहुतेक हिंदु सण-उत्सवांच्या वेळी विज्ञापनामध्ये ‘कुछ मीठा हो जाए’ च्या नावाने ‘चॉकलेट’चा प्रचार होतांना आपण पाहिला असेल; पण तुम्ही कधी ईद किंवा ख्रिसमस या सणांच्या वेळी शेवयांच्या ऐवजी चॉकलेट किंवा केकऐवजी कॅडबरी यांची विज्ञापने बघितली आहेत का ? नाही ना ! यालाच निवडक किंवा ‘टार्गेटेड’ विज्ञापने म्हटले जाते. मोठमोठी विदेशी बहुराष्ट्रीय आस्थापने सर्वप्रथम ज्यांच्यात जागरूकतेचा अभाव आहे आणि ज्यांना सहजपणे मूर्ख बनवता येऊ शकते, अशा समाजाला हेरतात अन् त्याच्या आधारावर विज्ञापनांचे मायाजाळ विणतात. ज्या देशात तोंड गोड करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने मिठाई बनत असेल आणि ज्यांना पाहूनच तोंडात लाळ येत असेल, त्या देशात ‘कुछ मीठा हो जाए’च्या नावाने येणार्‍या विज्ञापनाने प्रभावित होऊन चॉकलेट खाणे कितपत योग्य आहे ?

२. जगप्रसिद्ध असलेल्या भारतीय मिठाईचे विविध प्रकार !

जगात भारतीय मिठाईची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. आपल्या मिठाईसमोर विदेशातील सर्व पदार्थ फिके पडतात. विदेशात केवळ केक आणि चॉकलेट सोडून दुसर्‍या प्रकारची मिठाई बघायला मिळणेही दुर्लभ आहे. असे समजा की, विविध प्रकारची मिठाई बनवायची कलाच त्यांच्याकडे नाही. बंगालचा रसगुल्ला-छेना, मथुरेचा पेढा आणि गुलाबजाम, बुहरानपूरचा दराबा, वाराणसीचा लौंगलता अन् तिरंगा बर्फी, महाराष्ट्रातील सातार्‍याचा कंदी पेढा, आगर्‍याचा पेठा, लक्ष्मणपुरी आणि भाग्यनगरची फिरनी, पंजाब-हरियाणाची लस्सी, गुजरातचा जिलेबी फाफडा, याखेरीज भारताच्या सर्व राज्यांमध्ये बुंदी, खीर, बर्फी, घेवर, चुरमा, रबडी, फेणी, जिलेबी, आमरस, कलाकंद, रसमलाई, नानकटाई, मावा बर्फी, पुरणपोळी, मगज पाक, मोहन भोग, मोहन थाल, खजूरपाक, गोल पापडी, बेसन लाडू, शक्करपारा, मक्खन बडा, काजू कतली, सोहन हलवा, नारळाची बर्फी, सोनपापडी, इमरती, खाजा, मुरकी, चिक्की, श्रीखंड, मोतीचूर, गाजराचा हलवा असे अनेक प्रकारचे मिष्ठान्न सहज उपलब्ध आहेत. हे गोड पदार्थ केवळ देशात लोकप्रिय आहेत, असे नव्हे, तर जगप्रसिद्धही आहेत. ‘जी ललचाए और रहा न जाए’, ही म्हण भारतीय मिठाईंवर एकदम बरोबर लागू होते.

३. जनतेची दिशाभूल करण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरण्यात येणे

गेल्या उन्हाळ्यात स्वदेशी चळवळ राबवण्यात आली होती. या माध्यमातून जनतेला संदेश देण्यात आला होता की, शीतपेय पिण्याऐवजी उसाचा रस किंवा लिंबू सरबत सेवन करा. असे म्हटले जाते की, या चळवळीने घाबरलेल्या विदेशी आस्थापनांनी बाजारातून लिंबूची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली. ज्यामुळे लिंबूचे भाव गगनाला भिडले. त्यामुळे लोकांनी लिंबू खरेदी करणे टाळले. याखेरीज दिवाळीचा सण जवळ येतो, तेव्हाच प्रसारमाध्यमांमध्ये भेसळ माव्याची वृत्ते दाखवून खळबळ माजवली जाते. काही दुकानांवर धाडसत्र आरंभले जाते. ज्यामुळे लोकांची दिशाभूल व्हावी आणि लोकांनी भारतीय पदार्थांच्या ऐवजी चॉकलेट खरेदी करण्याकडे वळावे. अशा प्रकारच्या अनेक क्लृप्त्या वापरल्या जातात.

४. विज्ञापनांवर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका !

असे म्हटले जाते, ‘एक खोटे १०० वेळा सांगितले, तर ते खरे वाटायला लागते.’ काहीसे अशाच प्रकारे विज्ञापनांच्या माध्यमातून प्रतिदिन आपल्या समोर खोटी माहिती ठेवली जाते. विज्ञापनांमध्ये विज्ञानासमवेत मानसशास्त्राचाही उपयोग केला जातो. ज्यामुळे त्याचा लोकांच्या मेंदूवर परिणाम होतो. विज्ञापनांमध्ये करण्यात येणारे खोटे दावे आणि प्रक्षोभक प्रचार यांमुळे लोकांचा गोंधळ होतो अन् ते अलगदपणे आस्थापनांच्या तावडीत सापडतात.

५. विदेशी चॉकलेट, केक आणि शीतपेये मुलांच्या आरोग्याला हानीकारक असल्याने त्यांच्यावर बहिष्कार घालणे आवश्यक !

विदेशी पदार्थ भारताची सामाजिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक प्रतिष्ठा उद्ध्वस्त करतात, तसेच आपल्या आरोग्यावरही वाईट परिणाम करतात. भारतीय गोड पदार्थ स्वधर्म, कर्म, संस्कृती, सण आणि परंपरा यांचा शतकानुशतके एक भाग राहिले आहेत; पण हळूहळू स्वदेशी मिष्ठान्न विज्ञापनांच्या मायाजाळात ते अस्तित्वहीन बनत चालले आहेत.

अधिक प्रमाणात चॉकलेट सेवन केल्याने मुलांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, निद्रानाश, डोकेदुखी, अर्धशिशी, चिडचिड, आंत्र सिंड्रोम, डायरिया आणि इरिटेबल बाऊल सिंड्रोम, चक्कर येणे, चिंता, तणाव, डिहायड्रेशन, दात कमकुवत होणे, हृदयरोग आदी रोग होऊ शकतात. डार्क चॉकलेटमध्ये असलेले उच्च कॅफीन, ओक्स्लेट, टाईरामाईन, सॅच्युरेटेड फॅट आणि साखर वरील रोगांसाठी उत्तरदायी समजले जातात. त्यामुळे ज्या प्रकारे जनतेकडून ‘बॉयकॉट बॉलीवूड’ नावाने हिंदी चित्रपटांचा बहिष्कार करण्यात येत आहे, त्याच धर्तीवर विदेशी चॉकलेट, केक आणि शीतपेये यांचा बहिष्कार होणे आवश्यक आहे.

६. सरकारने विज्ञापनांना नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे आवश्यक !

विज्ञापनांच्या या खेळात व्यावसायिक स्वत:च्या लाभासाठी लोकांच्या आरोग्याचा जेवढा खेळ करतात, तेवढेच अभिनेते-अभिनेत्री आणि खेळाडूही काही रुपयांसाठी विज्ञापन करून लोकांचा विश्वासघात करतात. त्यामुळे सरकारनेही या गोष्टी गांभीर्याने घेऊन विज्ञापनांच्या मानसशास्त्रीय अत्याचारांवर तात्काळ प्रतिबंध घातला पाहिजे. यासमवेतच खोट्या विज्ञापनांवरील नियंत्रणासाठी एक मंडळ स्थापन करून कठोर नियम बनवण्यात यावेत. या मंडळाने त्या पडताळल्यानंतरच असे विज्ञापन प्रसारित करण्याची परवानगी देण्यात यावी. सध्या विज्ञानाच्या जगात जीवनाचा बाजार मांडण्यात आला आहे. त्यांना सामाजिक बांधिलकीशी काहीही देणे-घेणे नाही. आपल्यालाच समाज म्हणून सतर्क, सजग, सशक्त आणि संघटित राहून ‘बॉयकॉट चॉकलेट’, ‘बॉयकॉट केक’, ‘बॉयकॉट कोल्ड्रिंक’ यांची चळवळ बुलंद करावी लागेल आणि त्याचा प्रारंभ स्वत:पासून करावा लागेल.’

– श्री. मुकेश गुप्ता (साभार : ‘हिंदी विवेक’, सप्टेंबर २०२२)

संपादकीय भूमिका

विदेशी चॉकलेट आणि तत्सम पदार्थ यांचे दुष्परिणाम जाणून सण-उत्सवाला भारतीय पदार्थच भेट देण्याचा निर्धार करा !