देहली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्या घरावर आक्रमण

वाहनांची तोडफोड करत घरात घुसण्याचा प्रयत्न

देहली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल

नवी देहली – देहली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्या घरावर अज्ञातांनी आक्रमण करून त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्वाती मालीवाल यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली. स्वाती मालीवाल यांनी याप्रकरणी देहली पोलिसांकडे तक्रार करत असल्याचे सांगितले.

स्वाती मालीवाल यांनी १७ ऑक्टोबरला सकाळी ट्वीट करून, ‘काही वेळापूर्वी काही जण माझ्या घरात घुसले आणि त्यांनी आक्रमण केले. त्यांनी माझी आणि माझ्या आईची गाडी फोडली. सुदैवाने मी आणि आई दोघेही घरी नव्हतो, नाहीतर काय झाले असते ठाऊक नाही! तुम्ही काहीही करा, मी घाबरणार नाही’, अशी माहिती दिली.

साजिद खान यांच्या विरोधात आवाज उठवल्यापासून धमक्या

स्वाती मालीवाल यांनी आरोप केला आहे, ‘जेव्हापासून मी चित्रपट निर्माता आणि बिग बॉस स्पर्धक साजिद खान याच्या विरोधात आवाज उठवला आहे, तेव्हापासून मला विविध धमक्या दिल्या जात आहेत.’

देहली महिला आयोगाने साजिद खान याला बिग बॉस या कार्यक्रमामधून काढून टाकण्याची मागणी केली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, साजिद खानवर १० हून अधिक महिलांचा लैंगिक छळ आणि अश्‍लील वर्तन केल्याचा आरोप आहे. त्यांनी याविषयी माहिती आणि प्रसारण मंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

संपादकीय भूमिका

देहलीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे ही घटना दर्शक आहे ! याविषयी केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा !