भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ दाखवण्यासाठी छापले गारुड्याचे व्यंगचित्र !

  • स्पेनच्या दैनिकाने भारताला हिणवले !

  • भाजपच्या खासदाराने नोंदवला निषेध !

‘ला व्हॅनगार्डिया’ या स्पेनमधील दैनिकाने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचे प्रसिद्ध केलेले व्यंगचित्र

नवी देहली – ‘ला व्हॅनगार्डिया’ या स्पेनमधील चौथ्या क्रमांकाच्या दैनिकाने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. यामध्ये भारताची वाढती अर्थव्यवस्था एका सापाच्या माध्यमातून दाखवण्यात आली असून सापाला एक गारुडी पुंगी वाजवून नाचवत आहे, अशा प्रकारे हे चित्र रेखाटण्यात आले आहे. यावरून या दैनिकाचा निषेध नोंदवण्यात येत आहे.

१. हा लेख ९ ऑक्टोबर या दिवशी ‘द आर ऑफ द इंडियन इकॉनॉमी’ म्हणजेच ‘भारतीय अर्थव्यवस्थेचा काळ’ या मथळ्याखाली प्रकाशित झाला असून लेखाला विरोध केला जात नसून व्यंगचित्र खटकणारे असल्याने भारतियांकडून त्यास मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे.

२. भाजपचे बेंगळुरू येथील खासदार पी.सी. मोहन यांनी या दैनिकातील लेखाचे छायाचित्र ट्वीट करून त्यावर नापसंती व्यक्त केली आहे. मोहन म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था सतत वाढत आहे; परंतु स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतरही भारताचे चित्र गारुड्याच्या माध्यमातून दाखवणे अत्यंत मूर्खपणाचे आहे. परकीय विचार पालटणे हे अवघड काम आहे.

३. ‘झिरोधा’ आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामत यांनीही संताप व्यक्त केला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची जगभरात नोंद घेतली जात आहे, ही पुष्कळ चांगली गोष्ट आहे; मात्र भारताचा प्रतिनिधी म्हणून एक गारुडी या लेखात दाखवण्यात आला आहे, तो देशाचा अवमान आहे.


भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनणार !

ब्रिटनला मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानावर पोचली आहे. सध्याच्या विकास दरानुसार भारत वर्ष २०२७ मध्ये जर्मनीला आणि वर्ष २०२९ मध्ये जपानला मागे टाकून जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल. ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या संशोधन अहवालानुसार या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकास दर १३.५ टक्के राहिला आहे. या दराने भारत या आर्थिक वर्षात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होण्याची शक्यता आहे.

________________________

संपादकीय भूमिका

  • एकेकाळी पाश्‍चात्त्य राष्ट्रे भारताला ‘गारुड्यांचा देश’ म्हणून हिणवत. आता भारताने अशांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे !