तुम्ही तरुण पिढीची मानसिकता बिघडवत आहात !

सर्वोच्च न्यायालयाने ‘एक्स.एक्स.एक्स.’ वेब सिरीजवरून निर्मात्या एकता कपूर यांना फटकारले !

नवी देहली – या देशाच्या युवा पिढीची मने तुम्ही गढूळ करत आहात. ‘ओटीटी’वरील (आस्थापनांनी थेट इंटरनेटद्वारे दर्शकांसाठी दिलेली सेवा म्हणजे ‘ओटीटी’ (‘ओव्हर द टॉप’) याद्वारे दर्शक चित्रपट, वेब सिरीज आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहू शकतात.) तुम्ही लोकांपुढे कोणत्या प्रकारचे पर्याय ठेवत आहात ? उलट तुम्ही तरुण पिढीची मानसिकता बिघडवत आहात. याविषयी काही तरी केले पाहिजे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने निर्मात्या एकता कपूर यांना फटकारले. एकता कपूर यांच्या अल्टबालाजी या ओटीटी मंचावरून ‘एक्स.एक्स.एक्स.’ही वेब सिरीज दाखवली जाते. या मालिकेमध्ये सैनिकाच्या पत्नीचे आक्षेपार्ह चित्रण केल्यामुळे भारतीय सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी एकता कपूर यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाले आहे. या अटक वॉरंटच्या विरोधात कपूर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने कपूर यांना फटकारले.

१. एकता कपूर यांचे अधिवक्ता मुकूल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले की, याप्रकरणी आम्ही पाटणा उच्च न्यायालयात याचिका केली आहे; पण तेथे ती लवकर सुनावणीला येईल, असे आम्हाला वाटत नाही. अशाच एका अन्य प्रकरणात याआधी सर्वोच्च न्यायालयाने कपूर यांना संरक्षण दिले होते. ही वेब सिरीज वर्गणीदारांसाठी आहे. या देशात लोकांना पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य आहे.

२. या युक्तीवादावर न्यायालयाने म्हटले की, तुम्ही लोकांपुढे कोणते पर्याय ठेवत आहात ? या प्रकारच्या याचिका केल्यावरून तुम्हाला दंड ठोठावला जाऊ शकतो. याचिकाकर्त्या नामांकित अधिवक्तांची नेमणूक करू शकतात, म्हणून त्या न्यायालयाचा वेळ वाया घालवू शकत नाही. आम्ही कनिष्ठ न्यायालयाचा आदेश वाचला आहे. तुम्ही तेथे स्थानिक अधिवक्ता नेमून तुमच्या अर्जाची सद्य:स्थिती तपासून पाहू शकता.

संपादकीय भूमिका

  • न्यायालयाने अशा मालिकांवर बंदी घालण्यासह अशा मालिकांना प्रमाणपत्र देणार्‍या संबंधित यंत्रणेवरही कारवाई करण्याचा आदेश दिला पाहिजे; म्हणजे अशा प्रकारच्या मालिका कुणी परत निर्माण करण्याचे आणि त्यांना प्रमाणपत्र देण्याचे धाडस होणार नाही !