पहिल्‍या पत्नीचे पोषण करण्‍यास सक्षम नसणारा मुसलमान दुसरा विवाह करू शकत नाही !

कुराणाचा संदर्भ देत अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – कुराणानुसार एखादी व्‍यक्‍ती तेव्‍हाच दुसरा विवाह करू शकते, जेव्‍हा ती तिच्‍या पहिल्‍या पत्नीचे आणि मुलांचे योग्‍यप्रकारे पालनपोषण करू शकतेे, तसेच त्‍यासाठी सक्षम असतेे. जर ती व्‍यक्‍ती त्‍यांचे पोषण करण्‍यास सक्षम नसेल, तर तिला दुसरा विवाह करण्‍याचा कोणताही अधिकारी नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाने कुराणाचा संदर्भ देत दिला. एका मुसलमान व्‍यक्‍तीने दुसर्‍या विवाहासाठी याचिका प्रविष्‍ट केली होती. ती याचिका न्‍यायालयाने वरील उदाहरण देत फेटाळून लावली.

१. न्‍यायालयाने पुढे म्‍हटले की, ज्‍या समाजामध्‍ये महिलांचा सन्‍मान केला जात नाही, तो समाज सभ्‍य समजला जात नाही. महिलांचा सन्‍मान करणारा देशच सभ्‍य देश म्‍हटला जाऊ शकतो. मुसलमानांनी पहिली पत्नी असतांना दुसरा विवाह करण्‍यापासून स्‍वतःला रोखले पाहिजे. कुराणात एका पत्नीला न्‍याय न देणार्‍याला दुसरा विवाह करण्‍यास अनुमती देण्‍यात आलेली नाही.

२. याचिकाकर्ता अजीजुर्रहमान याने हमीदुन्‍निशा हिच्‍याशी १२ मे १९९९ मध्‍ये विवाह केला होता. आता अजीजुर्रहमान याने हमीनदुन्‍निशा हिला न सांगता दुसरा विवाह करण्‍याचे ठरवले होते. या संदर्भात त्‍याने कौटुंबिक न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली होती; मात्र त्‍यावर निर्णय न आल्‍याने त्‍याने अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली होती.