न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड बनणार भारताचे ५० वे सरन्यायाधीश

न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनवणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश उदय उमेश लळित यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्या. चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली. २६ ऑगस्ट २०२२ या दिवशी सरन्यायाधीशपदी विराजमान झालेले उदय उमेश लळित हे ८ नोव्हेंबर २०२२ या दिवशी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा कार्यकाळ अवघ्या ७४ दिवसांचा होता.

सरकारने ७ ऑक्टोबर २०२२ या दिवशी पत्र लिहून सरन्यायाधीश लळित यांना त्यांचा उत्तराधिकारी नेमण्याची विनंती केली. त्यानुसार सरन्यायाधिशांनी सर्व न्यायमूर्तींच्या उपस्थितीत वरील घोषणा केली. सेवाज्येष्ठतेच्या नियमानुसार सरन्यायाधिशांनंतर न्या. चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सर्वांत वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत. न्या. चंद्रचूड आता ९ नोव्हेंबर २०२२ या दिवशी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. ते १० नोव्हेंबर २०२४ या दिवशी सेवानिवृत्त होतील, म्हणजेच त्यांचा कार्यकाळ २ वर्षांचा असेल.

वडिलांनंतर मुलगा सरन्यायाधीश होणे, हे सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील पहिले उदाहरण !

न्या. चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णु चंद्रचूड हे २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ या कालावधीत देशाचे १६ वे सरन्यायाधीश होते. आजपर्यंत सर्वाधिक काळ सरन्यायाधीशपदी राहिलेले ते पहिले आणि एकमेव होते. वडिलांनंतर मुलगा सरन्यायाधीश होणे, हे सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील पहिले उदाहरण आहे.