वर्ष २०२० च्या नवरात्रीच्या कालावधीत भाववृद्धी सत्संग ऐकतांना ठाणे येथील साधकांना आलेल्या अनुभूती

१. सौ. शालिनी पै, वर्तकनगर, ठाणे.

१ अ. रामनाथी आश्रम, म्हणजेच साक्षात् वैकुंठ लोकांतून नऊ दिवस श्री महालक्ष्मीच्या (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या) वाणीतून दैवी सत्संग मिळल्याबद्दल कृतज्ञता वाटणे : ‘नऊ दिवस रामनाथी आश्रमातून, म्हणजेच साक्षात् वैकुंठ लोकातून श्री महालक्ष्मीच्या (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या) वाणीतून दैवी सत्संग आम्हा सर्व साधकांना मिळत आहे’, असे मला वाटले. मला अतिशय आनंद होत होता. ‘दैवी वाणीतून येणारा प्रत्येक शब्द, भावपूर्ण प्रार्थना, श्री दुर्गादेवीच्या आवाहनासाठीचा घंटानाद, शंखनाद, वास्तूशुद्धी आणि उदबत्ती लावून झालेले सात्त्विक वातावरण, साक्षात् श्री दुर्गादेवीचे आगमन, प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रूपांत देवीचे दर्शन आणि सूक्ष्मातून देवीची स्थापना’ या सर्वांमुळे माझा भाव जागृत होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. ‘आमच्यापेक्षा भाग्यवान या जगात कोण आहे !’, असे वाटून माझी श्री गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त होत होती.’

२. श्री. प्रदीप खरोटे, नौपाडा, ठाणे.

२ अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भाववृद्धी सत्संग घेतांना भाव जागृत होऊन हलकेपणा जाणवणे : ‘नवरात्रोत्सवात घरात सूक्ष्मातून देव आले होते. त्यामुळे घरात आनंदी वातावरण होते. देवीची आरती करतांना मला पुष्कळ आनंद होऊन हलकेपणा जाणवत होता. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भाववृद्धी सत्संग घेतांना माझा भाव जागृत होऊन मला हलकेपणा जाणवत होता. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ बोलत असतांना ‘देवीच बोलत आहे आणि ती बोलतच राहू दे’, असे मला वाटत होते. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी देवीचे नाव घेतल्यावर ‘डोळ्यांसमोर पांढर्‍या प्रकाशाचा ठिपका दिसणे, एक दोन वेळा देवीचे अस्पष्टसे रूप दिसणे’, असे नवरात्रातील सर्व दिवस दिसले. या अनुभूतीसाठी कोटीशः कृतज्ञ आहे.’

३. सौ अरुंधती नवरंगे, नौपाडा, ठाणे.

३ अ. नवरात्रातील भाववृद्धी सत्संग म्हणजे ‘प्रचंड ऊर्जा प्रदान करणारे सोहळे आहेत’, असे वाटणे : ‘नवरात्रीच्या कालावधीतील भाववृद्धी सत्संग ही साधकांसाठी एक पर्वणीच होती. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘साक्षात् देवी प्रकट झाली आहे’, असे सांगितल्यावर माझ्या शरिरात पुष्कळ चैतन्य सळसळायचे आणि माझी भावजागृती व्हायची. मला या सत्संगांतून प्रचंड ऊर्जा मिळायची. ‘हे सत्संग म्हणजे ऊर्जा प्रदान करणारे सोहळे आहेत’, असे मला वाटायचे.’

(वर्ष २०२०)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक