बिदर (कर्नाटक) येथे ५६२ वर्ष जुन्या मदरशामध्ये जमावाकडून पूजा

  • मदरशाजवळ वर्षातून दोन वेळा केली जाते पूजा !

  • मुसलमानांकडून विरोध

बिदर (कर्नाटक) – येथे ५६२ वर्ष जुन्या महमूद गवान मदरशामध्ये जमावाने पूजा केल्याची घटना ६ ऑक्टोबरच्या रात्री घडली. या घटनेनंतर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुसलमान संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. वर्ष १४६० मध्ये हा मदरसा बांधण्यात आला होता. सध्या तो भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नियंत्रणात आहे. येथील एका ठिकाणी वर्षातून २ वेळा पूजा करण्याची अनुमती असतांना त्या जागेऐवजी मदरशात पूजा करण्यात आल्याने त्याचा विरोध केला जात आहे. पूजेच्या घटनेनंतर पोलिसांनी ९ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करून आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे. तसेच ५ जणांचा शोध घेण्यात येत आहे.

१. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार निजामच्या काळापासून दसर्‍याला पूजा करण्याची परंपरा आहे. मदरशाच्या आवारात एक मिनार आहे. वर्षातून दोन वेळा २ ते ४ लोक आतमध्ये पूजा करण्यासाठी जातात; पण या वेळी मोठ्या संख्येने लोक आतमध्ये गेले होते. कुणीही अवैधरित्या प्रवेशद्वार तोडून आतमध्ये घुसखोरी केलेली नाही. आम्ही गुन्हा नोंदवलेला आहे.

२. पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले की, हिंदू मदरशाच्या जवळ असणार्‍या झाडाजवळ जाऊन नेहमी पूजा करतात; पण या वेळी तिथे ते झाड नव्हते. हिंदू तेथे गेले असतील, तर यामध्ये काही नवीन नाही. प्रत्येक विजयादशमीला ते पूजा करण्यासाठी जातात.

असदुद्दीन ओवैसी यांची टीका

एम्.आय.एम्.चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी या घटनेवरून राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारवर टीका केली आहे. त्यांनी या घटनेसाठी जमावाला प्रोत्साहन दिल्याचा ओवैसी यांनी आरोप केला आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या मंदिरात इफ्तारची मेजवानी केलेली, तसेच नमाजपठण केलेले मुसलमानांना कसे चालते ?
  • ‘गंगा-जमुनी तहजीब’चा राग आळवून हिंदूंना नेहमीच उपदेशाचे डोस पाजणारे आता मुसलमानांच्या विरोधात चकार शब्दही काढत नाहीत, हे जाणा ! (हिंदू आणि मुसलमान यांच्यात कथित ऐक्य निर्माण करणारी संस्कृती म्हणजे ‘गंगा जमुनी तहजीब’ ! तिचे पालन करण्यासाठी केवळ हिंदूंवरच दबाव बनवला जातो.)