जगन्नाथ पुरी (ओडिशा) – येथे देशातील दुसर्या ‘राष्ट्रीय आदर्श वेद विद्यालया’चे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते ५ ऑक्टोबर या दिवशी उद्घाटन करण्यात आले. ‘श्री जगन्नाथ राष्ट्रीय आदर्श वेद विद्यालय’ असे या निवासी विद्यालयाचे नाव असून वेदमंत्रांच्या गजरात हे उद्घाटन करण्यात आले. हे माझे भाग्य आहे की, मला विद्यालयाचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली. वेद, तसेच संस्कृत यांच्याविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी, यासाठी येथे शिक्षण आणि निवास विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रधान या वेळी म्हणाले.
१. विद्यालयामध्ये ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद यांच्या अभ्यासक्रमांसह विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित, वैदिक गणित, इंग्रजी, समाजशास्त्र, संगणकविज्ञान, तसेच कृषी या विषयांचा अभ्यासक्रमही शिकवण्यात येणार आहे.
२. या विद्यालयामध्ये गुणवत्तेवर प्रवेश देण्यात येणार असून ‘वेद भूषण’ (इयत्ता नववी आणि दहावी) आणि ‘वेद विभूषण’ (इयत्ता अकरावी आणि बारावी) नावाने हे अभ्यासक्रम असतील, असे अधिकार्यांनी सांगितले.
३. हे अभ्यासक्रम वर्ष २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी असतील.
४. उत्तराखंड येथील बद्रीनाथ, तसेच आसाममधील गौहत्ती, गुजरातमधील द्वारका आणि कर्नाटकातील श्रृंगेरी येथेही अशा प्रकारची विद्यालये उभारण्यात येणार आहेत.
५. या वेळी केंद्रीय शिक्षणमंत्री प्रधान म्हणाले की, वेद हे केवळ मंत्र नव्हेत, तर वेदांमध्ये लिहिलेले सर्वकाही हे जीवनाच्या सर्व अंगांना वैज्ञानिक स्तरावर सिद्ध करते. मानवाच्या प्रत्येक समस्येसाठी वेदांमध्ये उपाय आहेत.