जगात अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणार्या ‘नोबेल’ पुरस्काराची गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घसरणच पहायला मिळत आहे. बहुतेक वेळा नोबेल पारितोषिक वादग्रस्त असलेल्या लोकांनाच देण्यात आले आहे. आताच्या काळात तर सातत्याने हिंदू आणि हिंदु धर्म यांचा जाहीर निषेध करणार्यांना ‘नोबेल’ देण्याचा सपाटाच नोबेलच्या समितीने लावला आहे. हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला ‘अल्ट न्यूज’चा सहसंस्थापक महंमद जुबेर (सीतापूर, उत्तरप्रदेश) याचे नाव ‘नोबेल’च्या पुरस्काराच्या शर्यतीत असल्याचे पुढे आले. यातून या पुरस्काराचा हिंदुविरोधी ‘अजेंडा’ पुढे आला आहे. परदेशातील विविध संस्था नेहमीच हिंदुत्वाच्या विचारधारेला, हिंदुत्वाचे काम करणार्या व्यक्ती-समूह यांना कशा प्रकारे पाण्यात पहातात आणि जाणीवपूर्वक याविरोधात काम करणार्यांना पुरस्कार देऊन जगात त्यांची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न करतात, हेच दिसून येते ! जुबेर याची ‘नोबेल’साठी निवड झालेली नाही. त्याला नामांकन देण्यात आले आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या लोकांना ‘नोबेल’ पारितोषिक देण्यात येते. त्या क्षेत्रात कार्यरत असणार्या संस्था, समिती, संघटना आणि विद्यापिठे यांना नोबेल समितीकडून नावे पाठवण्याची सूचना केली जाते. ही प्रक्रिया पूर्णपणे गुप्त असते. त्यामुळे जुबेर याचे नाव कुणी सुचवले ? हाच वादाचा विषय आहे. दंगली भडकावणार्या व्यक्तीला जर ‘नोबेल’साठी नामांकन मिळत असेल, तर भारतात आतंकवादी कारवाया आणि फुटीरतावादी कारवाया करणारे यांना तो मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही !
हिंदुद्वेषी निवड समिती !
प्रारंभीच्या काळातही देशाच्या फाळणीसाठी कारणीभूत असणारे, मुसलमानांना नेहमीच झुकते माप देणारे आणि हिंदूंना मात्र शांत रहाण्यास सांगणारे मोहनदास गांधी यांचे नावही नेहमी ‘नोबेल’ पुरस्काराच्या चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. नोबेल समितीकडून अनेक वेळा जे जे हिंदू आहेत, त्यांना डावलण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न झाले आहेत. उपअणूकणाविषयीच्या भौतिकशास्त्रातील शोधाविषयी सत्येंद्र नाथ बोस यांना नोबेलमधील वाटा नाकारण्यात आला होता. गरीब हिंदूंच्या आर्थिक असाहाय्यतेचा लाभ उठवत त्यांचे धर्मांतर करणार्या, तसेच जगासमोर भारताची चुकीची प्रतिमा उभी करणार्या कथित ‘मदर’ तेरेसा यांना वर्ष १९७९ मध्ये ‘नोबेल’ देण्यात आले होते.
भारतात गरीब हिंदूंसाठी काम करणार्या अनेक संस्था आहेत, ज्या कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता, तसेच कोणत्याही प्रकारचे विज्ञापन न करता कार्य करतात; मात्र अशा व्यक्ती अथवा संस्था यांना आजपर्यंत कधीही ‘नोबेल’ देण्यात आले नाही. याउलट ‘धर्मांतर करणे, हा ख्रिस्ती मिशनर्यांच्या कार्यप्रणालीतील प्राण आहे. तो काढून घेतल्यास मिशनरी मृतवत् होतील’, असे जाहीर मत प्रदर्शित करणार्या मदर तेरेसा यांना मात्र नोबेल देण्यात येते. ‘भारतात हिंदू गरीब, असाहाय्य आहेत’, असे म्हणणार्या मदर तेरेसा यांना स्वत:च्या अल्बेनिया देशात मात्र एकही निराधार सापडला नाही, हे आश्चर्यकारक आहे.
आपल्या ‘द आर्ग्यूमेंटेटिव इंडियन’ या पुस्तकाच्या माध्यमातून गाय, हिंदू, हिंदुत्व अशा शब्दांचा अयोग्य प्रकारे उपयोग करून परदेशात हिंदुत्वाच्या विचारधारेविषयी संभ्रम निर्माण करणार्या ‘देशात सध्या भीतीचे वातावरण आहे, हा देश केवळ हिंदूंचा नाही’, यांसारखी विधाने करणारे अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल देण्यात आले. ही केवळ काही प्रातिनिधिक उदाहरणे असून नोबेल समितीने नेहमीच हिंदुत्वाप्रती पक्षपाती धोरण राबवले. ज्यांनी ज्यांनी भारताची प्रतिमा अयोग्य पद्धतीने रंगवण्याचा प्रयत्न केला, ‘भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होतात’, असे लिखाण, शोध पत्रकारिता यांच्या माध्यमातून प्रयत्न केला, त्यांनाच पुरस्कार देण्याचे धोरण ठेवले आहे.
विशेष कर्तृत्व नसलेल्यांनाही ‘नोबेल’ !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक हुसेन ओबामा यांना ‘नोबेल’ का देण्यात आले ? त्यांचे कर्तृत्व काय होते ? याची कोणतीही उत्तरे नोबेल समितीकडे नाहीत. मलाला युसुफझाई हिला वर्ष २०१४ मध्ये शिक्षणासाठी विशेष काम केले म्हणून ‘नोबेल’ देण्यात आले; मात्र यानंतर गेल्या ८ वर्षांत तिने शिक्षणासाठी काही विशेष काम केल्याचे ऐकिवात नाही. भारतात ‘हिजाब’वरून आंदोलन चालू असतांना तिने भारतातील मुसलमानांची बाजू घेत ‘हिजाब न घालता विद्यार्थिनींना प्रवेश न देणे भयानक आहे. महिलांवर अल्प किंवा अधिक कपडे घालण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे’, असे म्हटले होते. विशेष म्हणजे याच मलालाने यापूर्वी ‘हिजाब’ला विरोध केला होता, म्हणजे जे जे भारताच्या संस्कृतीवर आघात करतात, त्यांना ‘नोबेल’सारखे पुरस्कार देऊन एकप्रकारे अशा कृती करणार्यांना प्रोत्साहित करण्याचे काम ‘नोबेल समिती’ करते !
खोट्या बातम्या देणार्या जुबेर याचे नामांकन !
महंमद जुबेर याने ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीवरील एका चर्चासत्रावरून ट्वीट करत यति नरसिंहानंद सरस्वती, महंत बजरंग मुनि आणि आनंद स्वरूप यांना ‘घृणा पसरवणारे’ म्हटले होते. ‘अल्ट न्यूज’वरून नेहमीच हिंदुविरोधी वृत्तांना अग्रक्रमाने स्थान दिले जायचे. यामुळे जुबेर याला कारागृहात जावे लागले होते आणि त्याची नुकतीच जामिनावर मुक्तता झाली आहे. हिंदूंना नेहमीच आरोपीच्या पिंजर्यात उभे करणार्या जुबेर याला ‘नोबेल’साठी नामांकन देऊन ‘जे अशा प्रकारे हिंदुविरोधी काम करतील, त्यांचा आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव करतो’, हाच संदेश देण्याचे काम केले आहे.
दुर्दैवाने भारतातही या ‘नोबेल’च्या वृत्तांना आणि तो मिळालेल्या व्यक्तींना वारेमाप प्रसिद्धी मिळते. यापुढील काळात हिंदूंना ‘नोबेल’चा पक्षपातीपणा जाणून घेऊन त्यांचा ‘हिंदुविरोधी अजेंडा’ हाणून पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागतील !
हिंदू आणि हिंदु धर्म यांचा जाहीर विरोध करणार्यांची ‘नोबेल’साठी निवड करणार्या आयोजकांना जाब विचारा ! |