आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटातील रावणाला मोगल आक्रमकांप्रमाणे दाखवले ! – सामाजिक माध्यमांतून टीका

‘आदिपुरुष’ या चित्रपटातील रावणाचे पात्र

नवी देहली – आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा ‘टीजर’ (अत्यंत संक्षिप्त भाग) प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. त्यामुळे यात दाखवण्यात आलेले रावणाचे पात्र मुसलमान आक्रमकांप्रमाणे दिसत असल्याची टीका सामाजिक माध्यमांतून केली जात आहे. अभिनेते सैफ अली खान यांनी रावणाची भूमिका साकारली आहे.

सामाजिक माध्यमांतून करण्यात येत असलेल्या टीका

१. रावण हा शिवभक्त होता. त्याने शिवतांडवाची रचना केली. त्याला वेदांचे ज्ञान होते. असे असतांना या चित्रपटातील रावण भयानक आणि मोगल शासकांप्रमाणे दिसत आहे.

२. काही सामाजिक माध्यमांतून वापरकर्ते रावणाची वेशभूषा पाहून त्याला औरंगजेब, तैमूर, अल्लाऊद्दीन खिलजी, बाबर, महंमद गझनी आणि अन्य मुसलमान आक्रमकांची नावे देत आहेत.

३. वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की, रावण एक ब्राह्मण होता, तर या चित्रपटात रावणाचे केस आधुनिक पद्धतीचे आणि लांब दाढी असलेले दाखवण्यात आले आहे.

४. एकाने म्हटले की, रावण कपाळावर टिळा लावत असे; मात्र या रावणाकडे पाहून त्याने धर्मांतर करून इस्लाम स्वीकारला आहे, असे वाटते.

५. महादेव मुंडे म्हणाले, ‘‘हा चित्रपट, म्हणजे रामायणाचा अवमान आहे का ? रावण आणि हनुमान यांना मुकुट का घातलेले दाखवले नाही ? रावण सर्वांत बुद्धीमान ब्राह्मण होता. आमच्या भावना दुखावणे बंद करा.’’

संपादकीय भूमिका

  • रावणाची वेशभूषा जर मुसलमानाप्रमाणे केली गेली असेल, तर केंद्रीय परिनिरीक्षण मंडळाने (‘सेन्सॉर बोर्डा’ने) हिंदूंच्या भावना लक्षात येऊन त्यात पालट करण्यास चित्रपट निर्मात्यांना सांगणे अपेक्षित आहे !