तमिळ कार्यकर्त्यांच्या अटकेच्या विरोधात तमिळी हिंदूंची श्रीलंकेत निदर्शने

श्रीलंकेत प्राचीन हिंदु मंदिराच्या भूमीवर बौद्ध विहाराच्या अवैध बांधकामाचे प्रकरण !

जाफना (श्रीलंका)  – येथील एका प्राचीन हिंदु मंदिराच्या भूमीवर बौद्ध विहाराचे  अवैध बांधकाम केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणार्‍या २ प्रमुख तमिळी कार्यकर्त्यांना श्रीलंका सरकारने अटक केली. या अटकेच्या निषेधार्थ तमिळी हिंदूंनी मुल्लेतिवू आणि जाफना येथे निदर्शने केली. श्रीलंकेच्या उत्तर प्रांतीय परिषदेचे माजी सदस्य टी. रविकरण आणि सामाजिक कार्यकर्ते आर्. मयुरन् यांना कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी कह्यात घेतले होते.

कुरुन्थुमलाई येथे बौद्ध विहाराच्या अवैध बांधकामाच्या विरोधात स्थानिक हिंदूंनी आंदोलन छेडले होते. श्रीलंकेच्या न्यायालयाच्या नवीन बांधकाम न करण्याच्या आदेशाला न जुमानता श्रीलंकेच्या अधिकार्‍यांनी कुरुन्थुमलाई टेकडीवरील प्राचीन हिंदु मंदिराच्या भूमीवर बौद्ध विहाराचे अवैध बांधकाम चालूच ठेवले आहे. जाफनामध्ये विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनी रविकरण आणि आर्. मयुरन् यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला आणि सिंहली बौद्धांचे अतिक्रमण रोखण्याची मागणी केली.

संपादकीय भूमिका

श्रीलंकेत हिंदूंची मंदिरे असुरक्षित !