नवरात्रीनिमित्त श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घेतलेल्या विशेष भक्तीसत्संगांच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी

१. सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी आध्यात्मिक त्रासामुळे पुष्कळ थकवा जाणवणे

‘६.१०.२०२१ या दिवशी सर्वपित्री अमावास्या होती. तेव्हा माझ्या सभोवती मला पुष्कळ दाब जाणवून ‘कोणीतरी माझी प्राणशक्ती खेचून घेत आहे’, असे दिवसभर आणि रात्री झोपेतही जाणवत होते. त्यामुळे मला पुष्कळ थकवा आला होता. मला दुसर्‍या दिवशीही थकवा होता. मला असलेल्या थकव्याचे प्रमाण अधिक असल्याने मला ग्लानी येत होती.

२. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घेतलेला विशेष भक्तीसत्संग आणि त्यांची चैतन्यमय वाणी यांच्या परिणामामुळे थकवा नाहीसा होणे

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून विशेष भक्तीसत्संग आरंभ झाले होते. सत्संग आरंभ होताच ‘सूक्ष्मातून घनघोर युद्धाला आरंभ झाला आहे. माझा देह म्हणजे युद्धभूमी आहे’, असे मला जाणवत होते. सत्संग संपल्यावर माझे मन प्रसन्न होते; पण मला थकवा होता. सायंकाळी सूर्यास्तानंतर मला असलेला थकवा उणावून मला बरे वाटू लागले. हा सर्व परिणाम श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घेतलेला विशेष भक्तीसत्संग आणि त्यांची चैतन्यमय वाणी यांचा होता.

३. वर्ष २०२१ मधील नवरात्रीतील विशेष भक्तीसत्संगांच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

३ अ. ‘वातावरणात देवीचे निर्गुण तत्त्व कार्यरत झाले आहे’, असे जाणवणे : वर्ष २०२० मध्ये नवरात्रीनिमित्त श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घेतलेल्या विशेष भाववृद्धी सत्संगांत देवीच्या सगुण तत्त्वाची अनुभूती येत होती. ‘वर्ष २०२१ मध्ये नवरात्रीच्या कालावधीत झालेल्या आरंभीच्या पाचही दिवसांत भक्तीसत्संगांच्या माध्यमातून ‘वातावरणात देवीचे निर्गुण तत्त्व पुष्कळ अधिक प्रमाणात कार्यरत झाले आहे’, असे मला प्रकर्षाने जाणवले.

३ आ. निर्गुण तत्त्वाच्या अनुभूती येणे : या दिवसांत भक्तीसत्संगांत देवीच्या सगुण रूपांचे वर्णन ऐकतांना मला देवीची रूपे न दिसता सूक्ष्मातून अनेक गोलाकार तरंग दिसणे, दैवी कण दिसणे, १० ते १५ मिनिटे मन निर्विचार होणे, सत्संग संपल्यावर प्रसन्नता जाणवणे आणि प्रसन्नतेत वृद्धी होणे, अशा अनुभूती आल्या.

३ इ. ‘नादलहरींसह ज्ञानलहरी अंतर्मनात जात आहेत आणि अंतर्मन प्रकाशमान होत आहे’, असे जाणवणे : या भक्तीसत्संगांत नाद (शंखनाद, घंटानाद, सिंहनाद, तुतारीचा नाद इ.) ऐकवण्यासह विवेचन केल्याने ‘नादलहरींसह ज्ञानलहरी वेगाने माझ्या अंतर्मनात जात आहेत. तेथे एक उर्जा निर्माण होत आहे. माझ्या अंतर्मनात असलेली नकारात्मक काळी शक्ती जळून भस्म होत आहे आणि अंतर्मन प्रकाशमान होत आहे’, असे मला जाणवले.

‘हे जगदंबे, तुझ्या कृपेने लाभत असलेल्या या भक्तीसत्संगांबद्दल आणि तुझ्या कृपेबद्दल तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, गोवा. (११.१०.२०२१)