शब्दांतील आणि शब्दावीण संवादातून ‘श्री गुरूंचे मनोगत’ जाणणार्‍या अन् ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित कृती करणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

‘सप्तर्षींनी जीवनाडीपट्टी वाचनात सांगितले, ‘जेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ परात्पर गुरु डॉक्टरांशी साधकांच्या साधनेविषयी बोलतात, तेव्हा काही वेळा गुरुदेव हातवारे करून किंवा मुखावरील भावातून उत्तर देतात. ‘त्यांचा कोणत्या गोष्टीला होकार आहे ? आणि कोणत्या गोष्टीला नकार आहे ?’, हे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनाच कळू शकते.’ १३.७.२०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेली ही सूत्रे वाचल्यावर काही दिवसांनी मी पत्नी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी याविषयी बोललो. तेव्हा त्यांनी भावपूर्णरितीने मला पुढील सूत्रे सांगितली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन घेतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी कथन केलेली सूत्रे !

१. शब्दातीत संवादातून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना काय अपेक्षित आहे ?’, हे जाणून तशी कृती करणे ‘‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले कधी माझ्याकडे पहातात, कधी हावभाव करतात आणि क्वचित्च कधी ते हातवारेही करतात. त्या वेळी शब्दातीत संवाद असतो. त्या वेळी ‘त्यांना काय सांगायचे आहे ?’, ते मला त्यांच्याच कृपेने समजते. त्यांनी कधी एखादा प्रश्न विचारला, तर त्यांना ‘पुढील कोणती कृती अपेक्षित आहे ?’, हे मला आतून समजते आणि माझ्याकडून तशी कृती होते.

२. ‘एकदा सूक्ष्मातून सतत मार्गदर्शन करतात’, याची अनुभूती घेणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना ‘ते काय सांगत आहेत ?’, हे लक्षात येत नव्हते; पण मला ते समजत होते. मी त्या साधकांना ‘त्यांनी काय करायला हवे ?’, हे सांगायचे. ही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची माझ्यावर असलेली कृपाच आहे की, मी काय करणे अपेक्षित आहे ?, हे मला समजते. मी कधी परात्पर गुरु डॉक्टरांना शंका विचारायला गेले, तर मी ‘तेथून कधी निघायचे ?’, हेही तेच मला आतून सुचवतात. मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या स्थूल सहवासात नसतांनाही, म्हणजे मी वेगळ्या ठिकाणी असतांनाही ‘गुरूंना काय अपेक्षित आहे ? कुठे काय सांगायला हवे’, हे तेच मला सुचवतात.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची दृष्टी पडल्यावर शारीरिक त्रास न्यून होणे

अनेकदा मला असे जाणवते की, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केवळ पाहिले, तरी माझे शारीरिक त्रास न्यून होतात. एकदा माझ्या उजव्या पावलावर सूज आली होती. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांची माझ्यावर दृष्टी पडली आणि काही वेळाने मला दोन्ही पावले सारखीच दिसायला लागली. देवाने माझ्या प्रारब्धातील पुष्कळ त्रास न्यून केला आहे. ‘हेच खरे सुख आहे’, असे मला वाटते. परात्पर गुरु डॉक्टरांची माझ्यावरील ही कृपा, म्हणजे श्रीविष्णुलीलाच आहे.

४. ‘आश्रमातील प.पू. भक्तराज महाराज यांचे स्थान तसेच, देवतांची चित्रे आणि मूर्ती हे सर्व चैतन्यमय असून ते चैतन्य स्वतःला शिकवत असते’, असा भाव असणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

मी सेवा करत असलेल्या कक्षाच्या बाजूला श्री सिद्धिविनायकाची मूर्ती आहे. तो सिद्धिविनायकच मला बुद्धी देतो. आश्रमात भवानीदेवीचे निर्गुण रूप आहे. आश्रमात असलेले ‘प.पू. भक्तराज महाराज यांचे स्थान, श्रीकृष्णाचे चित्र, श्रीकृष्णार्जुनाचा रथ, माझ्या सेवेच्या कक्षातील देवतांची छायाचित्रे आणि मूर्ती, तसेच अन्य देवतांची स्थापना, हे सर्व माझ्यासाठीच झाले आहे’, असे मला वाटते. हे सगळे चैतन्यमय आहे आणि हे चैतन्यच मला सतत शिकवत असते. श्री सिद्धिविनायक म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांचा प्राण आहे.

५. परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित अशी कृती करण्याचा अखंड ध्यास असणे

देवाप्रती भाव असलेल्या साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे नेहमी आतून मार्गदर्शन करतात. मी प्रथम सेवा करू लागले, तेव्हा मला याविषयी काहीच ठाऊक नव्हते. माझ्याकडून अनेक चुका होत असत. त्या वेळी सेवा करणार्‍या साधकांची संख्याही अल्प होती. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टरांना काय अपेक्षित आहे’, हा एकच विचार मनात ठेवून मी प्रयत्न करू लागले आणि याच विचाराने मला घडवले.’’

– (सद्गुरु) नीलेश सिंगबाळ (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे पती), धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती. (१८.९.२०२२)


‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सर्व करून घेतात’, अशी अतूट श्रद्धा असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

१. साधकांची साधना व्हावी, यासाठी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी अविरत प्रयत्न करणे 

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना गुरुकार्य आणि ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, यांचा अखंड ध्यास असतो. त्यांचे साधकांना तळमळीने मार्गदर्शन करणे आणि त्यांना घडवणे, साधकांच्या साधनेची घडी बसवणे हे सतत चालू असते. हे सर्व सांभाळतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चेहर्‍यावर कधीच ताण नसतो. ‘गुरुच सर्व करून घेतात’, अशी त्यांची अतूट श्रद्धा आहे. त्यामुळे त्या नेहमी सहजावस्थेत असतात आणि त्यांच्या बोलण्यात कधीच कर्तेपणा नसतो.

२. रात्री जागून साधकांची पत्रे आणि अन्य कागदपत्रे वाचणे

दिवसभरातील सेवा झाल्यानंतर त्या रात्री उशीरापर्यंत बसून साधकांकडून साधनेविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी आलेली पत्रे वाचून त्यावर खुणा करतात आणि पुढील नियोजन करतात.’

– (सद्गुरु) नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती. (१८.९.२०२२)


श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची त्यांचा मुलगा श्री. सोहम् सिंगबाळ यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

१. गुरुकार्यात एक मिनिटाचाही खंड पडू नये, यासाठी अथक प्रयत्न करणे

‘आईच्या मनात गुरुकार्याप्रती तीव्र तळमळ आहे. ती कुठल्याही स्थितीत, तसेच वैयक्तिक कामे करत असतांना गुरुकार्यात एक मिनिटाचाही खंड पडू नये, यासाठी अविरत प्रयत्न करते. आम्ही वैयक्तिक कामासाठी आश्रमाबाहेर गेल्यावरही ती भ्रमणभाषद्वारे सेवा करते. ‘नातेवाईक आणि संपर्कात येणार्‍या व्यक्ती यांनीही साधना करून स्वतःचा उद्धार करून घ्यावा’, याची तिला तळमळ आहे. त्यामुळे ती शक्यतो सगळ्यांना जोडून ठेवते आणि त्यांना जमेल अशी साधना, उदा. नामजप, प्रार्थना आदी करायला सांगते.

२. आईच्या वाणीतील चैतन्यामुळे पडणारा प्रभाव

२ अ. मोजक्या बोलण्यातूनही साधनेचे दृष्टीकोन अंतर्मनात कोरले जाणे : माझे दिवसभरात आईशी केवळ १५ मिनिटेच बोलणे होते. त्या वेळी ती आध्यात्मिक स्तरावर आणि तत्त्वनिष्ठ राहून बोलते. त्यामुळे या मोजक्या बोलण्यातूनही मला साधनेचे दृष्टीकोन मिळून तिच्या वाणीतील चैतन्यामुळे ते अंतर्मनात कोरले जातात.
२ आ. आईशी थोडा वेळ बोलल्यानेही साधकांच्या मनाचे समाधान होणे : तिच्या वाणीतील चैतन्यामुळे इतरांना एखादी गोष्ट समजावून सांगायला तिला विश्लेषण करावे लागत नाही. तिच्याशी थोडा वेळ बोलले, तरी साधकांच्या तोंडवळ्यावर समाधान दिसते. समाजातील व्यक्तींनाही तिचे सांगणे लवकर पटते.

३. अहंशून्यता असल्याने चुकांविषयी सतर्कतेने विचारणे

आई अध्यात्मात उच्च पदावर असूनही मला म्हणते, ‘‘माझे काही चुकत असल्यास मला सांग. या प्रसंगात ‘मी अजून काही करायला हवे होते का ? मी हे योग्य करत आहे ना ?’, याचे मला तत्त्वनिष्ठतेने उत्तर दे.’’ यातून मला तिच्यातील अहंशून्यता, साधनेचे गांभीर्य, सतर्कता आणि तत्त्वनिष्ठता या गुणांचे दर्शन झाले. मी एकदा सहज जिज्ञासेने तिला विचारले, ‘‘सद्गुरुपदी असल्यावर चूक कशी होऊ शकते ?’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘शंभर टक्के होईपर्यंत सतर्क राहून प्रयत्नरत असायला हवे.’’

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धेमुळे उत्साहाने अथक सेवा करणे

आईला एकाच वेळी अनेक सेवा आणि भ्रमणभाष येतात. असे सतत चालू असूनही ती कधीच थकलेली दिसत नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धेमुळे ती २४ घंटे उत्साही असते. ती सर्व सेवा तेवढ्याच उत्साहाने करते. तिला पाहून इतरांनाही उत्साही वाटते.

– श्री. सोहम् सिंगबाळ (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा मुलगा) (वय २५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/सद् गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक