पणजी, २३ सप्टेंबर (वार्ता.) – गोव्यात यंदा ‘सनबर्न’ महोत्सवाचे (इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टीव्हल) स्थळ निश्चित झालेले नाही, तरीही ‘सनबर्न’च्या आयोजकांनी ‘बुक माय शो’ या ‘ऑनलाईन’ आरक्षण संकेतस्थळावर तिकीटविक्रीला प्रारंभ केला आहे.
‘सनबर्न’ महोत्सवात अमली पदार्थांच्या अतीसेवनामुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्याने या महोत्सवाला सातत्याने विरोध होत असतांनाही गोवा शासनाने यंदा या महोत्सवाच्या आयोजनाला तत्त्वत: मान्यता यापूर्वीच दिलेली आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी यापूर्वी म्हटले आहे की, ‘सनबर्न’ महोत्सवाच्या आयोजकांना महोत्सवातील एक मंच स्थानिक कलाकारांना उपलब्ध करण्यास सांगितले जाणार आहे. ‘सनबर्न’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी करण सिंह म्हणाले, ‘‘यंदा ‘सनबर्न’ महोत्सवाचे स्थळ अजूनही ठरलेले नाही; मात्र कोरोना महामारीनंतर दोन वर्षे खंड पडल्यानंतर यंदा गोव्यात ‘सनबर्न’ महोत्सव नक्कीच होईल.’’ ‘सनबर्न’ला वर्ष २०१६ मध्ये गोव्यात विरोध झाल्यानंतर या महोत्सवाचे पुणे येथे आयोजन करण्यात आले. ‘सनबर्न’चा १० वा महोत्सव (वर्ष २०१६ मध्ये) प्रथमच गोव्याबाहेर पुणे येथे झाला आणि त्यानंतरची पुढील दोन वर्षेही हा महोत्सव पुणे येथे झाला होता. वर्ष २०१९ पासून ‘सनबर्न’ महोत्सवाचे पुन्हा गोव्यात आयोजन होऊ लागले आहे.
संपादकीय भूमिका‘गोव्यात अमली पदार्थ व्यवहाराला थारा देणार नाही’, हे सिद्ध करायचे असल्यास अमली पदार्थांची रेलचेल असलेल्या कार्यक्रमांनाही हद्दपार करणे आवश्यक ! |