‘सनबर्न महोत्सव’ यंदा ३ ऐवजी ४ दिवस ! – रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

महोत्सवातील एक दिवस गोमंतकीय कलाकार आणि गोव्याची संस्कृती यांच्या सादरीकरणासाठी

पणजी, ३ ऑगस्ट (वार्ता.) – यंदा डिसेंबर मासात होणारा ‘सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स’ (इडीएम्) महोत्सव यंदा नेहमीप्रमाणे ३ दिवसांऐवजी ४ दिवस होणार आहे. महोत्सवातील एक दिवस गोमंतकीय कलाकार आणि गोव्याची संस्कृती यांच्या सादरीकरणासाठी असेल, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले,

‘‘सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सवाला काही अटी घालून गोवा पर्यटन मंडळाने यापूर्वी तत्त्वत: मान्यता दिलेली आहे. आम्ही आयोजकांना यंदा ३ ऐवजी ४ दिवस महोत्सवाचे आयोजन करण्यास सांगितले आहे. यातील एक दिवस पूर्णपणे गोव्यातील कलाकारांना त्यांची कला आणि गोव्याची संस्कृती सादरीकरण करण्यासाठी उपलब्ध असणार आहे. यामध्ये केवळ गोव्यातील ‘डीजे’ आणि कलाकार हेच नव्हे, तर गोव्यातील खाद्यपदार्थही उपलब्ध असतील.’’ गोव्यात ‘सनबर्न’ महोत्सव प्रतिवर्ष वागातोर समुद्रकिनार्‍यावर होतो; मात्र मध्यंतरी काही वर्षे तो कांदोळी येथील समुद्रकिनार्‍यावर झाला होता

शासनाने पुढील सूत्रांवर विचार करण्याचे संस्कृतीप्रेमींचे आवाहन . . .

१. ‘ईडीएम’ महोत्सव युवा पिढीला व्यसनाधीन बनवणारे आणि पाश्चात्य विकृतीचे उदात्तीकरण करणारे आहेत.
२. ‘ईडीएम’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे.
३. ‘ईडीएम्’मध्ये अमली पदार्थांच्या अतीसेवनाने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. ‘ईडीएम्’च्या आयोजनामुळे अमली पदार्थ व्यवसायाला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन मिळणार आहे.