संभाजीनगर – ११ मे २०१८ या दिवशी जुन्या संभाजीनगर येथे मशिदीच्या नळावरून दंगल पेटली होती. त्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवून जवळपास १ सहस्र ५८८ दिवसानंतर ४४ जणांना पोलिसांनी २१ सप्टेंबर या दिवशी नोटिसा बजावल्या आहेत. शिंदेगट आणि भाजप यांनी या नोटिसांचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडले आहे, तर शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकात खैरे म्हणाले की, याविषयी लवकरच पोलीस आयुक्तांशी बोलून घेतो.
शहरातील मोतीकारंजा येथून चालू झालेल्या त्या दंगलीत दोघांचा मृत्यू झाला होता. १०० हून अधिक वाहने आणि २ सहस्र दुकाने जळून खाक झाली होती. एवढ्या मोठ्या संख्येने दंगलखोर असतांना आरोपी अल्प असण्याविषयी निरीक्षण नोंदवण्यात आले होते. त्यामुळे सिटी चौक पोलिसांनी ४४ जणांना पसार दंगलखोर घोषित करणारी नोटीस दिली.
शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असतांनाच ३ मासांपूर्वी नोटिसांची प्रक्रिया चालू झाली होती; मात्र नोटिसा आलेल्यांवर कुठलीही गंभीर कारवाई होऊ नये, याची पूर्ण काळजी आमचे सरकार घेत आहे. भाजपचे शहराध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांनीही महाविकास आघाडी सरकारमुळेच या नोटिसा दिल्या आहेत. याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे.