केंद्रीय अर्थमंत्र्यांचा बारामती दौरा
बारामती (जिल्हा पुणे) – भाजपकडून लोकसभा प्रवास योजना राबवली जात आहे. त्यानुसार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् या ३ दिवसांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौर्यावर आहेत. २३ सप्टेंबर या दिवशी सकाळी त्यांनी खंडेरायाच्या मंदिराला भेट दिली. देवस्थानच्या वतीने निर्मला सितारामन् यांच्या दौर्याची सिद्धता करण्यात आली होती. या वेळी त्यांच्यासमवेत इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील हेही उपस्थित होते. निर्मला सीतारामन् यांनी जेजुरी संस्थानच्या पदाधिकार्यांची बैठकही घेतली. त्या वेळी देवस्थानच्या वतीने निर्मला सीतारामन् यांना निवेदन दिले.
या निवेदनात जेजुरी गडाला पर्यटनाचा आणि वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा मिळावा, तसेच जेजुरी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्या थांबवाव्यात, अशी मागणी जेजुरी संस्थानच्या वतीने अर्थमंत्र्यांना करण्यात आल्याचे पंकज निकुडे यांनी सांगितले.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात केंद्रातून काहीतरी तडजोड होते, या विचारातून कार्यकर्ते काम करत नाहीत; मात्र या वेळी केंद्रातून कोणतीही तडजोड होणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचना केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन् यांनी भाजप कार्यकर्त्यांना केल्या आहेत.