साधकांवर वात्सल्यमय प्रीती करणार्‍या आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे साधकांनी घडावे’, याची तीव्र तळमळ असणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

भाद्रपद अमावास्या (२५.९.२०२२) या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत. यंदा भाद्रपद अमावास्या (२५.९.२०२२) या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे. गेल्या वर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या चैतन्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी, यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील काही साधक-साधिका त्या सेवा करतात, त्या खोलीत गेल्या होत्या. त्या वेळी त्यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती यांचा काही भाग त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण २२.९.२०२२ या दिवशी पाहिला. आज त्या पुढील भाग पाहूया.                          

भाग २

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/614446.html
श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

७. सौ. कीर्ती जाधव, पाटणतळी, फोंडा, गोवा.

७ अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या चेहर्‍यामध्ये पालट होऊन त्यातून पांढरा प्रकाश प्रक्षेपित होत असल्याचे आणि त्या त्यांचे तेज सर्व साधकांचे आध्यात्मिक त्रास न्यून करण्यासाठी प्रक्षेपित करत असल्याचे जाणवणे : प.पू. गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मागील अनेक वर्षांपासून श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा आम्हाला सहवास लाभत आहे. आम्हाला त्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळते. त्यामुळे काही काळानंतर त्यांच्या चेहर्‍यामध्ये होत असलेले पालट अनुभवायला मिळत आहेत. पूर्वी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा चेहरा पुष्कळ प्रमाणात गुलाबी रंगाचा दिसायचा. मी काल त्यांना १ वर्षानंतर भेटले. या वेळी त्यांच्या मुखाकडे पाहिल्यावर त्यावरील तेज पुष्कळ प्रमाणात वाढल्याचे मला जाणवले. आता त्यांचा चेहरा गुलाबी न दिसता ‘त्यातून सर्वांकडे पांढरा प्रकाश पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते. ‘जणूकाही श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदामाता त्यांचे तेज सर्व साधकांच्या साधनेसाठी आणि साधकांचे आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी प्रक्षेपित करत आहे’, असे मला जाणवले.

‘प.पू. गुरुदेवांनी साधनेत पुढे जाण्यासाठी आम्हाला अशी माऊली दिली आहे, याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनातील तळमळ पाहूनच आपणही पुष्कळ तळमळीने प्रयत्न करूया’, असा उत्साह निर्माण झाला. ‘हे गुरुमाऊली, तू हे सर्व देत आहेस, यासाठी तुझ्याचरणी कोटीशः कृतज्ञता ! श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द न् शब्द आमच्या स्मरणात राहून आमच्याकडून त्यांना अपेक्षित असे प्रयत्न करून घ्यावेत’, अशी आपल्या कोमल चरणी कळकळीची प्रार्थना !’

८. श्री. प्रकाश मराठे, (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

८ अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ खोलीत आल्यावर सूक्ष्म गंधासहित वार्‍याची झुळूक आल्याचे जाणवणे : ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या खोलीत गेलेले सर्व साधक आतुरतेने त्यांची वाट बघत होते. सर्व साधक भावविभोर स्थितीत होते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ खोलीत आल्या. तेव्हा ‘सूक्ष्म गंधासहित गार वार्‍याची झुळूक आली’, असे मला वाटले.

८ आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ साधकांशी प्रेमाने आणि अत्यंतिक तळमळीने बोलत असतांना ‘काळ तात्पुरता थांबला आहे’, असे वाटणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ सर्वांचे कौतुक करत होत्या. त्यांनी मला ‘उभे रहाण्यात काही अडचण नाही ना ?’, असेही विचारले. त्यांनी सर्वांना एका वेगळ्याच विश्वात नेले आणि त्या वेळी ‘काळ तात्पुरता थांबला आहे’, असे मला वाटले. त्यांनी ‘प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक स्तरावर कशी करायला पाहिजे ?’, हे सविस्तर सांगितले. त्या बोलतांना ‘प्रत्यक्ष महालक्ष्मीच बोलत आहे’, असे मला जाणवत होते. त्या प्रेमाने आणि अत्यंतिक तळमळीने बोलत होत्या. त्यामुळे ‘त्यांचे बोलणे अंतर्मनामध्ये जात आहे,’ असे मला वाटले.

देवाने दोन शब्द लिहून घेतले, त्यासाठी कृतज्ञ आहे.’

९. कु. कौमुदी जेवळीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

अ. ‘मी सकाळपासूनच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवसाचा आनंद घेत होते.

आ. ज्या वेळी त्या खोलीत आल्या, त्या क्षणापासून त्यांच्या डोळ्यांतून प्रीती, वात्सल्य आणि करुणा प्रक्षेपित होत होती.

इ. ‘सत्संगातील वातावरण पृथ्वीवरील नसून कुठल्यातरी वेगळ्याच लोकातील आहे’, असे मला अनुभवता येत होते.

ई. ‘साधक संख्या भरपूर असूनही सर्वजण तेवढ्या खोलीत बसू शकले; कारण ‘खोलीचे आकारमान वाढले आहे’, असे मला जाणवले.

उ. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा प्रत्येक शब्द थेट सर्वांच्या अंतर्मनात जाऊन प्रत्येकाला पुढे जाण्याची ऊर्जा अन् प्रेरणा देत आहे’, असे मला जाणवले.

ऊ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ याचे रूप, सुंदर मुखमंडल आणि करुणामय दृष्टी थेट अंतःकरणात कोरली गेली.

ए. त्यांच्या सत्संगात असतांना एक वेगळीच शीतलता अनुभवता आली.

ऐ. मी बराच वेळ उभी राहूनही मला कशाचीच जाणीव नव्हती. सर्वजण देहभान विसरून गेले होते.

ओ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ बोलत असतांना ‘त्यांचा प्रत्येक शब्द माझ्या स्थितीतून मला बाहेर काढण्यासाठीच आहे’, असे मला वाटले.

. कृतज्ञता : ‘हे देवा, तुझ्याच कृपेने मला या दिव्य सत्संगाला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली, त्यासाठी तुझी कृतज्ञ आहे.’

(सर्व लिखाणाचा दिनांक ७.१०.२०२१)

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या गेल्यावर्षी झालेल्या वाढदिवसाच्या वेळी आलेल्या अनुभूती

१. सौ. शौर्या मेहता (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), मडगाव, गोवा.

अ. ‘वर्ष २०२१ मध्ये झालेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवसाच्या वेळी ‘मी एका वेगळ्याच जगात आहे’, असे मला वाटले. त्यांचा वाढदिवस हा जणू सत्संगच होता आणि सत्संगानंतर मला ‘त्याच अवस्थेत रहावे’, असे वाटत होते.

आ. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या खोलीत निर्गुण तत्त्व वाढले होते. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी आम्हाला त्यांच्या वाढदिवसाची ही भेट दिली’, असे मला वाटले. आम्ही त्या खोलीत अनुमाने ४० साधक होतो; पण खोली पुष्कळ मोठी आणि निर्गुण वाटली.

इ. मी ३० मिनिटे उभे होते; पण माझे पाय थकले नव्हते. मला शरीर आणि मन यांचे अस्तित्व जाणवत नव्हते.

ई. ‘सर्व साधकांचे मन आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे मन एकमेकांमध्ये विलीन झाले आहे’, असे मला वाटले. खोलीत त्या साधकांशी बोलत होत्या. तेव्हा खोलीत असलेल्या साधकांव्यतिरिक्त तिथे जे साधक नव्हते, त्यांच्याबद्दलही त्यांच्या मनात पुष्कळ प्रेम जाणवले.’

२. सौ. संस्कृती सागवेकर, फोंडा, गोवा.

२ अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ खोलीत आल्यावर तेथील त्रासदायक स्पंदने जाऊन भाव आणि आनंद यांची स्पंदने जाणवणे : ‘खोलीत जाण्यापूर्वी वातावरणात अमावास्येची त्रासदायक स्पदंने जाणवत होती; पण श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ खोलीत येताच ती त्रासदायक स्पंदने विरघळून भाव आणि आनंद यांची स्पंदने जाणवू लागली.

२ आ. आध्यात्मिक त्रास उणावून मनाला शांत वाटणे : पितृपक्षात मला पुष्कळ त्रास होत होता. अमावास्येच्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मला त्रास होत होता. मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या खोलीत सायं. ५.३० नंतर गेले. तेव्हा ‘मला त्रास होत आहे’, याचा मला विसरच पडला. माझे मन शांत झाले. ‘मी एका वेगळ्याच लोकात आले आहे’, असे मला वाटू लागले. ‘माझ्या अवतीभोवती दैवी जीव आहेत’, असे मला वाटत होते. त्या वेळी मी संपूर्ण भावस्थिती अनुभवत होते.’

(सर्व लिखाणाचा दिनांक ७.१०.२०२१)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक