मुंबई येथील गोसावी (गुसाई) परंपरेचे शास्त्रीय गायक डॉ. श्यामरंग शुक्ल यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या गायनाच्या वेळी उपस्थित साधक अन् संत यांना आलेल्या दैवी अनुभूती

मुंबई येथील डॉ. श्यामरंग शुक्ल यांनी १७.९.२०२२ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधकांची भेट घेतली. संगीत विभागाच्या समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आतापर्यंत केलेल्या संशोधन कार्याविषयी डॉ. शुक्ल यांना माहिती दिली. डॉ. शुक्ल यांनी त्याविषयी जिज्ञासेने जाणून घेतले. त्यांच्या येथील वास्तव्याच्या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘डॉ. शुक्ल यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाचे सादरीकरण’ यांविषयी विविध प्रकारचे संशोधनाचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. त्यांच्या प्रयोगांदरम्यान उपस्थितांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि उपस्थित साधक अन् संत यांना आलेल्या दैवी अनुभूती पुढे दिल्या आहोत.

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.

गायन सादर करतांना डॉ. श्यामरंग शुक्ल

डॉ. श्यामरंग शुक्ल यांचा परिचय

डॉ. श्यामरंग शुक्ल

मूळ जौनपूर (उत्तरप्रदेश) येथील आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असलेले डॉ. श्यामरंग शुक्ल हे गोसावी (गुसाई) परंपरेचे शास्त्रीय गायक आहेत. त्यांचे वडील पं. राजाराम शुक्ल हे त्यांचे संगीतगुरु होते. डॉ. श्यामरंग शुक्ल ‘प्रयाग संगीत समिति’, ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय’ आणि ‘इंदिरा कला संगीत विश्वविद्यालय’ या संगीत महाविद्यालयांत ‘एम्.ए., पी.एच.डी.’ या परीक्षांसाठी परीक्षक म्हणून कार्यरत होते. ते संगीताच्या विविध पैलूंवर लेखन करतात आणि आजपर्यंत त्यांचे शेकडो लेख प्रसिद्ध झाले आहेत. ते ‘सोहं संजीवनी’, ‘मावल वार्ता गौरव’ आणि ‘ब्रजमंडल संगीत क्लब’ यांसारख्या संस्थांकडून सन्मानित आहेत.

गुसाई परंपरेचे शास्त्रीय गायक डॉ. श्यामरंग शुक्ल यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य जाणून घेण्यासाठी आलेले डॉ. श्यामरंग शुक्ल यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमालाही भेट देऊन तेथील कार्य जाणून घेतले. डॉ. शुक्ल पुष्कळ जिज्ञासू असून त्यांनी सर्व आश्रम आत्मीयतेने पाहिला. ‘आश्रम, ध्यानमंदिरातील देवतांची चित्रे, आश्रमात आपोआप उमटलेले ॐ’ यांविषयी ते कुतुहलाने आणि जिज्ञासेने जाणून घेत होते. आश्रम पहातांना डॉ. शुक्ल यांनी आश्रमाविषयी व्यक्त केलेले मनोगत पुढे दिले आहे.

१. ‘आश्रमात पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असून येथे दैवी शक्ती आहे. येथे माझ्या मनात कुठलेच नकारात्मक विचार आले नाहीत.

२. आश्रमातील सगळ्या साधकांच्या चेहर्‍यावर प्रसन्नता दिसते.

३. यापुढे मी नियमितपणे गायन सेवा सादर करायला अवश्य  येथे येईन.’

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.

१. डॉ. श्यामरंग शुक्ल यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१ अ. विनम्रता : ‘डॉ. शुक्ल वयाने मोठे असूनही सर्वांशी नम्रतेने बोलतात. त्यांना काही विचारायचे असल्यास ते नम्रतेने विचारतात.’ – सौ. अमृता देशपांडे आणि सौ. अनघा जोशी, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.

१ आ. सहजता : ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांच्या त्यांच्याशी झालेल्या प्रथम भेटीत ते साधकांशी पूर्वीची ओळख असल्याप्रमाणे सहजतेने बोलले.’- कु. मयुरी आगावणे आणि सौ. अनघा जोशी, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.

१ इ. अल्प अहं : ‘आम्ही त्यांना संगीताच्या प्रयोगांसंदर्भात काही पालट सुचवले. त्या वेळी त्यांनी ते सहजतेने स्वीकारले. ‘आप जैसा कहोगे, वैसा करेंगे ।’, असे ते सतत म्हणत होते.’ – कु. मयुरी आगावणे, सौ. अनघा जोशी आणि सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.

२. डॉ. श्यामरंग शुक्ल यांच्या राग गायनाच्या वेळी संत आणि साधक यांना आलेल्या अनुभूती

२ अ. राग चारुकेशी

१. ‘डॉ. श्यामरंग शुक्ल राग ‘चारुकेशी’ गात असतांना मला शक्ती आणि भाव यांची स्पंदने जाणवली. ते जसजसे राग गात होते, तसतशी वातावरणात चैतन्याची स्पंदने वाढली.’- सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.

२. ‘डॉ. शुक्ल यांच्या या राग गायनाच्या वेळी तेजतत्त्व, तसेच सूर्याेदयाच्या वेळी असलेल्या कोवळा सूर्यप्रकाश मला अनुभवता आला. त्यांचे विलंबित लयीत राग गायन चालू असतांना मला बसलेल्या स्थितीतील श्री गणपतीचे दर्शन झाले, तर मध्यम लयीत राग गायन चालू असतांना ‘श्री गणपति नर्तन करत आहे’, असे मला दिसले. डॉ. शुक्ल यांचे गायन ऐकतांना माझी अंतर्मुखता वाढली आणि भावजागृती झाली.’

२ आ. राग दरबारी कानडा

‘डॉ. शुक्ल यांच्या या राग गायनाच्या वेळी गायन करत असलेल्या ठिकाणी उच्च स्वर्गलोकाचे वायूमंडल निर्माण झाल्याचे मला जाणवले.’

– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ता साधक), फोंडा, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक