कुंडातील पाण्याला हिरवा रंग
कोल्हापूर – श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरात असलेल्या मनकर्णिका कुंडाच्या उत्खननाचे काम जवळपास वर्षभर झाले ठप्प आहे. कुंडाच्या शेजारी असलेल्या एका इमारतीमधील एका दुकानदाराकडून सहमती आलेली नाही. त्यामुळे या इमारतीची हस्तांतर प्रक्रिया रखडली आहे. हे हस्तांतर झालेले नसल्याने या भागातील उत्खननाचे काम ठप्प आहे. याचसमवेत महापालिकेच्या भुयारी गटार योजनेतील पाणी या कुंडात मिसळते. यामुळे सध्या या पाण्याला हिरवा रंग आला आहे.
हिंदू विधीज्ञ परिषदेने मिळवलेल्या माहितीच्या अधिकारातील माहिती, यानंतर श्रीमहालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने उभा केलेला लढा, तसेच शिवसेनेने केलेली करसेवा यांमुळे कुंडावरील शौचालय हटले. यानंतर उत्खननास प्रारंभ झाला; मात्र कुंडाचे उत्खनन चालू केल्यावर कुंडाच्या शेजारी एक इमारत असून त्या बाजूचे उत्खनन चालू केल्यास इमारत पडण्याचा धोका असल्याचे समोर आले. त्यामुळे ही इमारत पूर्णत: मोकळी करूनच काम करणे आवश्यक आहे. काही काळ न्यायालयीन लढा दिल्यावर या इमारतीचे मालक तिचा ताबा देवस्थान समितीकडे देण्यास सिद्ध झाले आहेत; मात्र यातील एक दुकानदार ते मान्य करण्यास सिद्ध नाहीत. त्यामुळे त्याचे हस्तांतराचे काम रखडले आहे.