पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कुनो नॅशनल पार्क’मध्ये पिंजरे उघडून सोडले चित्ते !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – आफ्रिका खंडातील नामिबिया देशातून आणण्यात आलेले ८ पैकी ३ चित्ते मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंजरे उघडून सोडले. येथे पंतप्रधानांसाठी १० फूट उंच मंच बांधण्यात आला होता. या मंचाखाली पिंजर्‍यात चित्ते होते. पंतप्रधानांनी पिंजरा उघडल्यावर हे चित्ते बाहेर आले. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी स्वतः छायाचित्रकाद्वारे त्यांची काही छायाचित्रेही काढली. या वेळी त्यांच्यासमवेत राज्यपाल मंगूभाई पटेल आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान होते.

यानंतर एका कार्यक्रमात भाषण करतांना मोदी यांनी म्हटले की, वर्ष १९४७ मध्ये देशात केवळ ३ चिते शिल्लक असतांना त्यांचीही शिकार करण्यात आली. हे दुर्दैव आहे की, वर्ष १९५२ मध्ये आपण चित्ते नामशेष घोषित केले; परंतु त्यांच्या पुनर्वसनासाठी अनेक दशके प्रयत्न केले गेले नाहीत. आज स्वातंत्र्याच्या अमृत काळात आता देशात नव्या ऊर्जेने चित्त्यांचे पुनर्वसन होऊ लागले आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ते पुन्हा धावतील. येत्या काळात येथे पर्यटन वाढेल. रोजगाराच्या नवीन संधी वाढतील.