मनसे ‘रझाकार’ आणि ‘सजाकार’ या दोघांचा बंदोबस्त करेल !  

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्राद्वारे चेतावणी

मुंबई – मराठवाडा मुक्तीसंग्रामाविषयी विशेष बोलले जात नाही; कारण रझाकारांचे लांगूलचालन करण्यात धन्यता मानणार्‍यांचे सरकार कित्येक वर्षे राज्यात होते. त्यामुळे हे होणे स्वाभाविक होते; पण सध्या याच रझाकारांची पुढची औलाद ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना’च्या सोहळ्यात सहभागी व्हायला नकार देते. दुर्दैव असे की माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर केवळ ‘रझाकार’च नाहीत, तर आधुनिक ‘सजाकार’ही येऊन बसले आहेत. गेली कित्येक वर्षे संभाजीनगर महापालिकेतील आसंदीत बसून लूट करणारे आणि प्रतिदिन संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे ‘सजाकार’ या दोघांचा बंदोबस्त मनसे करील, अशी चेतावणी देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मुक्तीसंग्राम दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

१७ सप्टेंबर या दिवशी हैद्राबाद (भाग्यनगर) मुक्तीसंग्राम दिन होता. या निमित्ताने ठाकरे यांनी पत्र लिहित ‘हा दिवस सणासारखा साजरा झाला पाहिजे’, असे आवाहन केले होते. पत्रात ठाकरे यांनी म्हटले की, मराठवाडा मुक्तीसंग्राम हा काही विलिनीकरणाचा लढा नव्हता, तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबाद (भाग्यनगर) येथील निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचे अखंडत्वच धोक्यात आले असते. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला, तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे; म्हणून हा दिवस एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे.

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास शाळेत शिकवण्याची मागणी !

‘मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास शाळेत शिकवा’, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. ते म्हणाले की, इतक्या मोठ्या लढ्याविषयी आपल्याकडे बर्‍यापैकी अनभिज्ञता आहे. मला अनंत भालेराव यांचे या विषयावरील पुस्तक वाचून लढ्याविषयी काही गोष्टी कळल्या. मग पुढे नरहर कुरुंदकर यांची या विषयावरील काही व्याख्याने ‘यूट्यूब’वर ऐकतांना नवीन माहिती मिळाली; पण एकूणच असे वाटते की, या इतक्या गौरवशाली लढ्याविषयी विशेष कुणाला ठाऊक नाही. आता जे नवे शिक्षण धोरण येत आहे, त्यानुसार त्या त्या राज्यातील पुसला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुळे ‘मराठवाडा मुक्तीसंग्रामा’चा विस्तृत इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा महाराष्ट्राने अन् मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये.