पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले ‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
साधकांना ज्ञान मिळत असल्यास ‘त्यासंदर्भात काय करायचे ?’, हे उत्तरदायी साधकांना विचारून घ्यावे !साधना करत असतांना साधकांना अनेक प्रकारच्या अडचणी येतात. काही जणांना सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त होते; परंतु ‘हे ज्ञान चांगल्या शक्ती देत आहेत कि अनिष्ट शक्ती ज्ञान देऊन आपल्याला फसवत आहेत’, हे आपल्या लक्षात येत नाही. अशा प्रकारचे सूक्ष्मातून ज्ञान मिळाल्यास ‘ते सकारात्मक आहे कि नकारात्मक’ असा विचार करू नये. त्यापेक्षा ‘त्यासंदर्भात काय करावे ?’, हे आपल्या उत्तरदायी साधकांना विचारून करावे. हे या लेखावरून लक्षात येईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
सद्गुरु ताई (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ),
नमस्कार !
‘माझ्या मुलीचा नामजप पूर्ण होत नव्हता. युवा साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्या साधिकेने मला सुचवले, ‘‘तुमच्या मुलीचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प होत आहेत. तुम्ही नामजपाला बसतांना तिला तुमच्या समवेत नामजपाला घेऊन बसा.’’ त्यानुसार ३०.११.२०२१ या दिवसापासून आम्ही दोघी जणी (मी आणि माझी मुलगी) एकाच वेळी नामजप करण्यासाठी बसत आहोत.
१. नामजप करतांना माझ्या मुलीला आलेली अनुभूती
१ अ. षट्चक्रे दिसणे : ‘पहिल्या दिवशी नामजप झाल्यावर मुलगी मला म्हणाली, ‘‘मला नामजप करतांना षट्चक्रे दिसली.’’
२. नामजपाला बसल्यावर मुलीला सूक्ष्मातून मिळत असलेले मार्गदर्शन !
२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मुलीला ‘बाबांचे (माझ्या यजमानांचे) व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प होत असल्यामुळे ते मायेत अडकत आहेत’, असे सांगणे : १.१२.२०२१ या दिवशी नामजप करतांना मुलीचे ध्यान लागले. ध्यानावस्थेत असतांना तिला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आसंदीत बसले आहेत’, असे दिसले. ते तिला म्हणाले, ‘बाबांचे (माझ्या यजमानांचे) व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प होत असल्यामुळे ते मायेमध्ये अडकत आहेत.’
२ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेले मार्गदर्शन ! : २.१२.२०२१ या दिवशी नामजप करण्यासाठी आम्ही रात्री साधारण ८ ते ९ या वेळेत नामजपाला बसलो. तेव्हा तिला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ हे दोघेही दिसले. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ तिला म्हणाल्या, ‘तू व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढव. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया कर. तुला गुरुदेव सूक्ष्मातून दिसतात ना, त्यांच्याकडून अधिकाधिक ज्ञान ग्रहण कर आणि नेहमी शिकण्याच्या स्थितीत रहा.’
२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘सकाम आणि निष्काम साधना म्हणजे काय ?’, याविषयी अवगत करणे : ३.१२.२०२१ या दिवशी नामजप करतांना मुलीला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले दिसले. त्यांनी तिला सकाम आणि निष्काम प्रार्थनेचे प्रकार सांगितले. ते तिला म्हणाले, ‘जेव्हा आपण देवाकडून अपेक्षा ठेवून प्रार्थना करतो, तेव्हा ती सकाम साधना होते आणि जेव्हा आपण अपेक्षाविरहित प्रार्थना करतो, तेव्हा ती निष्काम साधना होते. नेहमी प्रार्थना करतांना ती तळमळीने आणि भावपूर्ण केली पाहिजे. सकाम प्रार्थना केल्यावर आपली साधना तिथे वापरली जाते; म्हणून नेहमी निष्काम प्रार्थना केली पाहिजे.’
२ ई. ४.१२.२०२१ या दिवशी नामजप करतांना माझ्या मुलीला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘प्रार्थना आणि कृतज्ञताभाव वाढव’, असे सांगितले.
२ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मुलीला ‘पूर्वजांच्या त्रासाच्या निवारणासाठी दत्ताचा नामजप करा आणि गावी असलेल्या घरी अधिकाधिक रहा’, असे आईला सांगण्यास सूक्ष्मातून सांगणे : ५.१२.२०२१ या दिवशी नामजपासाठी बसल्यावर सूक्ष्मातून गुरुदेव माझ्या मुलीला म्हणाले, ‘आईला सांग, ‘अनुभूतींमध्ये अडकायचे नाही. तुम्हाला पूर्वजांचा त्रास होत आहे; म्हणून दत्ताचा नामजप चालू करा. गावी असलेले घर पूर्ण झाल्यावर तुम्ही अधिकाधिक तिकडे रहाण्याचा प्रयत्न करा. पुढे आपत्काळाची तीव्रता अधिक वाढेल. तेव्हा तुम्हाला तिथे जाण्यात अडचणी येऊ शकतात.’
– एक साधिका (मुलीची आई) (६.१२.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |