देहली उच्च न्यायालयाचा ॲमेझॉनला आदेश !
नवी देहली – देहली उच्च न्यायालयाने पाकिस्तानमध्ये बनवण्यात येत असलेल्या ‘रूह अफजा’ या सरबताला सूचीतून हटवण्याचा आदेश ॲमेझॉन या ऑनलाईन विक्री करणार्या आस्थापनाला दिला आहे. ‘रूह अफजा’ हे सरबत प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. या सरबताची निर्मिती मूलत: ‘हमदर्द’ नावाचे भारताचे आस्थापन करते. काही दिवसांपूर्वी ‘हमदर्द’ने पाकिस्तानमध्ये ‘रूह अफजा’ या नावाने अवैध पद्धतीने बनवलेले सरबत ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असल्याची तक्रार केली होती.
१. ‘हमदर्द’ने याचिका प्रविष्ट करून वेगवेगळी आस्थापने ॲमेझॉनवर अवैध पद्धतीने ‘रूह अफजा’ या नावाने सरबत विकत असल्याचे म्हटले होते. काही विक्रेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर त्यांनी ही विक्री थांबवली होती; पण पाकमध्ये बनलेल्या रूह अफजाच्या बाटल्या विकणारा एक विक्रेता कायदेशीर नोटीस पाठवूनही ॲमेझॉनवर पुन्हा विक्री करत असल्याचे लक्षात आले होते.
२. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत देहली उच्च न्यायालयाने ॲमेझॉनवरून पाकिस्तानी रूह अफजा तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशासह ॲमेझॉनला ४ आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी ३१ ऑक्टोबरला होणार आहे.