गडचिरोली – दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील चिकटवेली गावातील ८ मासांच्या आदिवासी गर्भवती महिलेला अहेरी तालुक्यातील कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले जात होते; मात्र रस्ता खराब असल्याने त्या महिलेला प्रसूतीकळा चालू होऊन वाटेतच तिचा मृत्यू झाला. झुरी तलांडी (वय २६ वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना ६ सप्टेंबरच्या रात्री घडली आहे.
तालुका मुख्यालयापासून ७० किमी लांब असलेल्या चिकटवेली या गावात ३ लहान-मोठे नाले पार करून जावे लागते. अनेक वर्षांपासूनची रस्ता बांधण्याची मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. या गर्भवती महिलेला ३५ कि.मी. जवळील कमलापूर आरोग्य केंद्रात भरती करण्यासाठी तिचे पती आणि नातेवाईक ट्रॅक्टरने निघाले; मात्र खराब रस्त्यामुळे ट्रॅक्टरचे चाक खड्ड्यातच रुतले. विलंब झाल्याने झुरी हिने वाटेतच प्राण सोडले. कुटुंबियांनी अर्ध्यातूनच तिला घरी परत नेऊन दुसर्या दिवशी अंत्यविधी पार पाडला.
आठवडाभर याविषयी कुणालाच माहिती नव्हती. जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्र कमलापूर गावातील कर्मचार्यांना याविषयी कळले, तेव्हा त्यांनी कसेबसे चिकटवेली गाव गाठून माहिती घेतल्याने हे प्रकरण समोर आले.
वेळेत पोचल्यास जीव वाचला असता !
मृत गर्भवती महिलेला त्या दिवशी सकाळपासूनच त्रास होत होता; मात्र तिच्या नातेवाइकांनी गावातील पुजार्याकडे उपचार केले. रात्रीच्या सुमारास प्रकृती अधिक बिघडल्याने तिला आरोग्य केंद्रात आणण्यात येत होते; मात्र तिचा वाटेतच मृत्यू झाला. जर ती ३ घंटेआधी पोचली असती, तर तिचे प्राण वाचले असते. – डॉ. राजेश मानकर, वैद्यकीय अधिकारी, कमलापूर.
संपादकीय भूमिका
|