संभाजीनगर – येथील बाजार समितीची जिन्सी येथे १५ सहस्र ६४५ चौरस मीटर जागा आहे. तिचा व्यवहार २१ कोटी ७५ लाख रुपयांमध्ये झाला होता. प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर न्यायालयानेही व्यवहाराला मान्यता दिली असतांना तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका अर्जावर या व्यवहाराला स्थगिती दिली होती, तसेच बाजार समितीच्या संचालक मंडळावर गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले; मात्र मंत्र्यांनी नियम डावलून घेतलेल्या या निर्णयाला खंडपिठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी स्थगिती देत सत्तार यांना दुसर्यांदा चपराक दिली आहे.
‘सत्तार यांच्याकडे वेगवेगळ्या भूमींच्या चौकशीसाठी वारंवार अर्ज करणार्या डॉ. दिलावर मिर्झा बेग या व्यक्तीची विभागीय आयुक्तांनी चौकशी करून २६ सप्टेंबर या दिवशी अहवाल सादर करावा, तोपर्यंत विद्यमान महसूलमंत्री आणि राज्यमंत्री यांनी या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये’, असेही खंडपिठाने बजावले आहे. वर्षभरापूर्वीही अन्य एका ५० कोटी रुपयांच्या भूमीच्या व्यवहारात तत्कालीन महसूल राज्यमंत्री सत्तार यांनी हस्तक्षेप करून निर्णय दिला होता. या प्रकरणात त्यांच्यावर खंडपिठासमोर माफीनामा सादर करण्याची नामुष्की ओढवली होती.