‘मठ-मंदिर स्वच्छता उपक्रमा’च्या अंतर्गत विहिंप आणि बजरंग दल यांच्याकडून इचलकरंजी (कोल्हापूर) येथे पंचगंगा नदीघाटाची स्वच्छता !

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), १२ सप्टेंबर (वार्ता.) – ‘मठ-मंदिर स्वच्छता उपक्रमा’च्या अंतर्गत विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून गणेशोत्सवानंतर पंचगंगा नदीघाटाची स्वच्छता करण्यात आली. यात ज्या श्री गणेशमूर्ती नदीकाठावर आल्या आहेत, त्या परत विसर्जित करण्यात आल्या. याचसमवेत घाट परिसरात पडलेला कचरा, प्लास्टिक बाजूला काढून नदीघाट परिसर स्वच्छ करण्यात आला.

या उपक्रमात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. महाजनगुरुजी, सर्वश्री राजकरण शर्मा, आनंदा मकोटे, सुजीत कांबळे, सोमेश्वर वाघमोडे, अमोल शिरगुप्पे, संजय माने, सुरेश शिंदे, राजू सवाईराम, मुकेश चोथे, नरेंद्र-पंडित आण्णा यांसह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. या संदर्भात अधिक माहिती देतांना सोमेश्वर वाघमोडे म्हणाले, ‘‘गेल्या ८ मासांपासून आम्ही ‘मठ-मंदिर स्वच्छता उपक्रम’ राबवत आहोत. यात मंदिर, मठ, गोशाळा यांची स्वच्छता केली जाते. मंदिरे ही हिंदु धर्मातील प्रेरणास्रोत आहेत. त्यामुळे ती जतन, संवर्धन करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यापुढील काळात स्मशानभूमी स्वच्छतेचा उपक्रमही आम्ही घेणार आहोत.’’