पुणे येथे वर्ष २०१९ च्या तुलनेत श्री गणेशमूर्ती लाखाने घटल्या !

निर्माल्य संकलनातही लक्षणीय घट

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – यंदाच्या वर्षी उत्सवावरील कोरोनाचे निर्बंध हटवल्याने, तसेच महापालिकेत समाविष्ट २३ गावांमधील गणेशोत्सव मंडळे आणि घरगुती गणपती यांमुळे मूर्तींची संख्या वाढेल अशी अपेक्षा होती; मात्र शहरातील श्री गणेशमूर्तींची संख्या वर्ष २०१९ च्या तुलनेत जवळपास लाखाने घटलेली आहे. वर्ष २०१९ मध्ये शहरात ५ लाख ३० सहस्र ९०९ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते, तर वर्ष २०२२ मध्ये ही संख्या ४ लाख ३० सहस्र ९१ एवढीच राहिली. घरगुती गणपतींची संख्या घटल्याने यंदा निर्माल्य संकलनही लक्षणीय घटले आहे.

पुणेकरांसाठी यंदा गतवर्षीपेक्षा दुप्पट म्हणजेच जवळपास १५० फिरते विसर्जन हौद उपलब्ध करून दिले होते. त्यानंतरही हौदांमध्ये केवळ ५४ सहस्र ७०३ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या, तर वर्ष २०२० मध्ये ६० फिरते हौद असतांना त्यात ८२ सहस्र ५५१, तर वर्ष २०२१ मध्ये १ लाख ४४ सहस्र मूर्तीचे विसर्जन करण्यात आले होते. यंदा या हौदांचे नियोजन फसल्याने या हौदांकडे पुणेकरांनी पाठ फिरवली असून महापालिकेने केलेला दीड कोटींचा व्ययही वाया गेला आहे. (याचा अर्थ भाविकही हौदात विसर्जन करण्याकडे पाठ फिरवत आहेत, असा होतो. फिरत्या हौदांसारख्या अशास्त्रीय गोष्टींवर कोट्यवधी रुपयांचा व्यय करण्यापेक्षा महापालिकेने भक्तांना वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जनासाठी सोय उपलब्ध करून दिली असती, तर भाविकांना श्री गणेशमूर्तींचे विधीवत् विसर्जन करता आले असते ! – संपादक)

——————————————————————————————————–

पुणे येथील ‘संस्कार प्रतिष्ठान’ आणि महापालिका यांच्या धर्मद्रोही उपक्रमाला भाविकांचा अल्प प्रतिसाद, केवळ ७ सहस्र ४९९ मूर्तींचे दान !

दान घेतलेल्या मूर्तींचे मोशी येथील तळ्यामध्ये विसर्जन केले

पिंपरी (जिल्हा पुणे) – मागील काही वर्षांपासून संस्कार प्रतिष्ठान चिंचवड येथील घाटावर मूर्तीदान उपक्रम राबवत आहे. पर्यावरणाचा कळवळा असणार्‍या या संघटनेच्या माध्यमातून दान घेतलेल्या मूर्ती या गेल्या काही वर्षांत विनोदे वस्ती, वाकड येथील खाणीत विसर्जित होत होत्या. या वर्षी मात्र मूर्तींचे मोशी येथील तळ्यात विसर्जन करण्यात आले. या वर्षी केवळ ७ सहस्र ४९९ मूर्ती दान केल्या गेल्या. पालिका प्रशासनाने पण सामाजिक संस्था, संघटना यांचे साहाय्य घेऊन मूर्तीदान अथवा संकलन करण्याचा उद्देश ठेवून विसर्जन घाट बंद केले होते. असे असतांनाही मूर्तीदानाला मिळालेला अल्प प्रतिसाद हा गणेशभक्त जागृत झाल्यामुळेच आहे, असे म्हणावे लागेल.

मागील काही वर्षांपासून चिंचवड शहरात संस्कार प्रतिष्ठानच्या माध्यमातून मूर्तीदान आणि निर्माल्य जमा केले जात आहे. वर्ष २०२० मध्ये १७ सहस्र ५४६ मूर्ती दान करण्यात आल्या होत्या. वर्ष २०१८ मध्ये गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी ४३ सहस्र १२७, तर वर्ष २०१९ मध्ये ५२ सहस्र ५७७ मूर्ती दान करण्यात आल्या होत्या. या वर्षी मात्र भाविकांनी या धर्मद्रोही उपक्रमाला अल्प प्रतिसाद देत गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी केवळ ७ सहस्र ४९९ मूर्ती दान केल्या आहेत. या आकड्यांवरून मूर्तीदान उपक्रमाच्या माध्यमातून होणारी दिशाभूल ही भाविकांच्या लक्षात आल्याने ते जागृत झाले आहेत.

संपादकीय भूमिका 

हिंदूंनो जागे व्हा ! वर्षभर पर्यावरण रक्षणासाठी काही न करणार्‍या या संस्था केवळ हिंदूंच्या गणेशोत्सवात पर्यावरणरक्षणाचे कारण देत मूर्तीदानासारखे अशास्त्रीय उपक्रम राबवून भाविकांची दिशाभूल करत आहेत. धर्मशास्त्रानुसार मूर्तीदान अयोग्य आणि अशास्त्रीय आहे. त्यामुळे गणेशभक्तांनीच आता दान घेतलेल्या श्री गणेशमूर्तींचे पुढे काय होते ? याचे वास्तव जाणून अशा संस्थांच्या भूलथापांना बळी न पडता शास्त्रानुसार वहात्या पाण्यातच विसर्जन करायला हवे !