मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत व्याख्यानांतून धर्मशिक्षणासह हिंदूसंघटन अन् प्रथमोपचार यांविषयी प्रबोधन !

हिंदु जनजागृती समितीचा गणेशोत्सवकाळातील उपक्रम !

तुर्भे येथील माथाडी कामगार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे व्याख्यान घेतांना डावीकडून समितीचे श्री. संदीप शिंगाडे आणि श्री. हेमंत पुजारे

मुंबई – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही गणेशोत्सवात ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई आणि पालघर जिल्ह्यात एकूण २० ठिकाणी गणेशोत्सव मंडळांमध्ये व्याख्याने घेऊन एकूण ६०० हून अधिक भाविकांचे प्रबोधन करण्यात आले. या व्याख्यानांतून श्री गणेशाच्या उपासनेमागील शास्त्र, आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?, तसेच दैनंदिन जीवनात करावयाची साधना, हिंदूसंघटनाची आवश्यकता यांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

काही ठिकाणी श्री गणेशाचा सामूहिक नामजपही घेण्यात आला, तर काही ठिकाणी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. नवी मुंबईमध्ये ३ ठिकाणी ‘प्रथमोपचार’ या विषयावर व्याख्याने घेण्यात आली. या व्याख्यानांनाही गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवाविषयी प्रबोधन करणार्‍या फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन काही मंडळांत लावण्यात आले होते. या सर्व व्याख्यानांनंतर ‘नवरात्र आणि अन्य सण-उत्सवांतही असे कार्यक्रम आमच्याकडे घ्या’, असे अनेक ठिकाणी आयोजकांनी सांगितले, तर काही उत्सव मंडळांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि प्रथमोपचार प्रशिक्षण उपक्रम घेण्यास सिद्धता दर्शवली आहे.