आसाममध्ये २ जिहादी आतंकवाद्यांना अटक

अटक करण्यात आलेले आतंकवादी

गौहत्ती – आसाममध्ये ‘अन्सारुल्ला बांग्ला टीम’च्या (एबीटीच्या) २ आतंकवाद्यांना पोलिसांनी अटक केली. मुसादिक हुसेन आणि इक्रामुल इस्लाम अशी अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांची नावे आहेत. इक्रामुल हा इमाम (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा प्रमुख) असून त्याला नागाव जिल्ह्यातून अटक करण्यात आली, तर हुसेन याला मोरीगाव जिल्ह्यामध्ये अटक करण्यात आली, अशी माहिती मोरीगावचे पोलीस अधीक्षक अपर्णा एन्. यांनी ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेला दिली.

१. गेल्या मासामध्ये मोरीगाव जिल्हा प्रशासनाने मोईराबारी येथील मदरसा पाडला होता. राज्य प्रशासनाने आतापर्यंत राज्यभरातील ३ मदरसे उद्ध्वस्त केले आहेत. तसेच आतंकवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून इमाम आणि मदरसा शिक्षक यांच्यासह ४० जणांना अटक केली आहे.

२. एका मदरशाच्या मौलवीला देशविरोधी कारवायांच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यानंतर स्थानिकांनी स्वत:हून तो मदरसा पाडला होता.

३. आतंकवादी हे धर्मगुरूंच्या वेशात राज्यात घुसले असून ते विध्वंसक आणि राष्ट्रविरोधी कारवाया करत आहेत, अशा बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या.

मदरसा शैक्षणिक संस्था नाही, तर आतंकवादी केंद्र ! – मुख्यमंत्री

आसाम राज्यातील काही मदरसे शैक्षणिक संस्था नसून आतंकवादी केंद्रे बनली आहेत, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले होते. राज्याला भेट देणार्‍या इस्लामिक शिक्षकांवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. तसेच राज्य एक पोर्टल विकसित करत आहे जिथे त्यांचे तपशील नोंद केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

हिमंत बिस्व सरमा मुख्यमंत्री झाल्यापासून आतंकवाद्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जात आहेत. आसाममध्ये आतापर्यंत ४० आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यावरून तेथे आतंकवादाने हात-पाय पसरले असून त्याची पाळे-मुळे खणून काढण्यासाठी सरकारने आणखी कठोर कारवाया करणे अपेक्षित आहे !