‘प्रेरणाप्रद कथाएं’ या हिंदी पुस्तकात मला पुढील कथा वाचायला मिळाली.
‘एकदा देवासुरांमध्ये मोठे युद्ध झाले. भगवंताच्या कृपेमुळे त्या युद्धात देवतांना विजय मिळाला. परमेश्वर आणि शास्त्र यांची मर्यादा भंग करणारे असुर पराभूत झाले. देवतांना हा महान विजय मिळण्यामागे केवळ भगवंताची कृपा आणि इच्छा हेच कारण होते; मात्र देवतांना ते उमगले नाही. त्यांनी विचार केला, ‘हा विजय आमचाच आहे आणि हे भाग्य, हे सुयश केवळ आमच्या पराक्रमामुळेच आम्हाला लाभले आहे.’ भगवंताला देवतांच्या मनातील हा विचार तात्काळ समजला. ‘खोटा अहंकार, म्हणजे सर्व दुर्गुणांची खाणच असते’, हे जाणून भगवंत स्वतःच देवतांचा हा अहंकार दूर करण्यासाठी एका अद्भुत यक्षाच्या रूपात देवतांच्या समोर प्रगट झाला.
देवता भगवंताच्या या अद्भुत रूपाला ओळखू शकल्या नाहीत आणि त्यांना मनोमन फार आश्चर्य वाटले. नंतर त्यांनी अग्निदेवाला त्या यक्षाविषयी माहिती काढून आणण्यासाठी पाठवले. अग्निदेव तेथे पोचल्यानंतर यक्षरूप भगवंताने त्याला प्रश्न विचारला, ‘‘आपण कोण आहात ?’’ अग्निदेव म्हणाला, ‘‘तुम्ही मला ओळखले नाही ? मी या जगात ‘अग्नि’ या नावाने प्रसिद्ध असलेली धगधगीत ज्वाळा (वैश्वानर) आहे.’’ यक्षरूप भगवंताने विचारले, ‘‘तू एवढा सुप्रसिद्ध आणि गुणसंपन्न आहेस. तुझ्यामध्ये अशी कोणती मोठी शक्ती आहे ?’’ त्यावर अग्निदेव गर्वाने म्हणाला, ‘‘मी या चराचर विश्वाला क्षणात जाळून भस्म करू शकतो, एवढी माझ्यामध्ये शक्ती आहे.’’ त्यावर (यक्षरूपातील) भगवंताने त्याच्यासमोर गवताची एक काडी ठेवली आणि म्हटले, ‘‘कृपा करून हे जाळून दाखवा.’’ अग्निदेवाने पुष्कळ प्रयत्न केले; पण त्याला ती काडी जाळता आली नाही. तो क्रोधाने स्वतः पायापासून डोक्यापर्यंत प्रज्वलित झाला; परंतु ती गवताची काडी जशीच्या तशीच होती. तिला आगीची किंचितही झळ पोचली नव्हती. शेवटी अग्निदेव निराश झाला आणि लज्जित होऊन देवांकडे परत गेला. तो देवतांना म्हणाला, ‘‘मी त्या यक्षाला मुळीच ओळखू शकलो नाही.’’
त्यानंतर सर्वांच्या संमतीने वायुदेव त्या यक्षाकडे गेला आणि भगवंताने त्यालाही विचारले, ‘‘तू कोण आहेस आणि तुझ्यामध्ये अशी कोणती मोठी शक्ती आहे ?’’ वायुदेवाने छाती फुगवून म्हटले, ‘‘मी संपूर्ण विश्वात ‘वायु’ या नावाने प्रसिद्ध आहे. ‘मी मातरिश्वा, म्हणजे संपूर्ण अंतरिक्षात चालणारा वायुदेव आहे’ आणि मी पृथ्वीवरील सर्व पदार्थांना क्षणार्धात या अंतरिक्षात उडवू शकतो.’’ यावर भगवंताने त्याला गवताची एका काडी दाखवली आणि त्या गवताच्या काडीला उडवून दाखवायला सांगितले. वायुदेवाने स्वतःचे सर्व सामर्थ्य, संपूर्ण शक्ती पणाला लावली; परंतु ती काडी जागेवरून मुळीच हलली नाही. शेवटी वायुदेव लज्जित होऊन परतला. त्या वेळी देवतांनी त्याला विचारले, ‘‘काय झाले वायुदेवा ? ‘तो यक्ष कोण होता ?’, हे कळले कि नाही ?’’ तेव्हा त्यानेही सांगितले, ‘‘तो यक्ष नक्की कोण आहे ?’, हे मला मुळीच ओळखता आले नाही.’’
आता शेवटी सर्व देवतांनी इंद्राला विनंती करत म्हटले, ‘देवराज इंद्र, आपणच ‘तो यक्ष कोण आहे ?’, हे ओळखावे.’’ यावर इंद्र म्हणाला, ‘‘फारच छान !’’ त्यानंतर तो यक्षाकडे गेला तर खरा; परंतु इंद्रदेव तेथे पोचण्यापूर्वीच तो यक्ष अंतर्धान झाला होता. शेवटी इंद्रदेवाची दृढ भक्ती आणि जिज्ञासा पाहून साक्षात् उमादेवी, म्हणजे मूर्तीमंत ब्रह्मविद्या भगवती पार्वती आकाशात प्रगट झाली. इंद्राने तिला विचारले, ‘‘माते, हा यक्ष खरा कोण होता ?’’ भगवती उमा म्हणाली, ‘‘तो यक्ष प्रसिद्ध परब्रह्म परमेश्वरच होता. त्याचीच कृपा आणि लीलाशक्ती यांमुळे असुर युद्धात पराजित झाले आहेत. तुम्ही सर्व देवता या युद्धात केवळ निमित्तमात्र होता. तुम्ही सर्व देवता ज्याला आपला विजय आणि शक्ती मानत आहात, तो तुमचा निव्वळ वेडेपणा किंवा वृथा अहंकार आहे. तुमचा हा मोहमयी विनाशकारी भ्रम दूर करण्यासाठीच परमेश्वर तुमच्या समोर यक्षरूपात प्रगट झाला आणि त्याने कुतूहल दाखवले अन् तुम्हा सर्वांचे गर्वहरण केले आहे. आता तुम्ही सर्व देवता हे चांगल्या प्रकारे लक्षात घ्या, ‘या विश्वात ज्या मोठमोठ्या पराक्रमी लोकांचा पराक्रम, बलवानांचे बळ, विद्वानांची विद्या, तपस्वींचे तप, तेजस्वींचे तेज आणि ओजस्वींचे ओज आहे, ते सर्व त्याच परम लीलामय प्रभूच्या लीलामयी विविध शक्तींचा केवळ एक अल्पांश आहे आणि या विश्वाच्या संपूर्ण चलनवलनाचे केंद्र एकमात्र तोच ‘सच्चिदानंदघन परब्रह्म परमेश्वर’ आहे. प्राण्याला स्वतःच्या शक्तीचा जो अहंकार होतो, तो त्याचा निव्वळ भ्रमच असतो.’’
भगवती उमेचे हे वचन ऐकून इंद्राचे डोळे उघडले. त्याला आपल्या चुकीची पुष्कळ लाज वाटली. त्याने परत येऊन सर्व देवतांना संपूर्ण रहस्य सांगून सुखी केले.’
– केनोपनिषद् (साभार : प्रेरणाप्रद कथाएँ, गीताप्रेस, गोरखपूर)
‘महर्षींनी आता परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले’, असे संबोधित करायला सांगितले आहे; पण ‘सच्चिदानंद परब्रह्म’ या उपाधीचा अर्थ मला ठाऊक नव्हता. त्यांच्याच कृपेने या कथेतून मला त्या उपाधीचा पुढील अर्थ समजला, ‘जो या विश्वातील ज्या मोठमोठ्या पराक्रमी लोकांचा पराक्रम, बलवानांचे बळ, विद्वानांची विद्या, तपस्वींचे तप, तेजस्वींचे तेज आणि ओजस्वींचे ओज यांचा अल्पांश आहे; तसेच जो विश्वाच्या संपूर्ण चलनवलनाचे एकमेव केंद्र आहे, तो म्हणजे ‘सच्चिदानंद परब्रह्म’ होय !’ ‘खरोखर ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले’ असेच सामर्थ्यशाली आहेत’, असे वाटून माझ्याकडून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.’
– (पू.) पद्माकर होनप (वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.८.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |