अनुभवजन्य ज्ञान असणारे प.पू. दास महाराज यांचे लिखाण !‘प.पू. दास महाराज यांचे प्रतिदिनचे अनुभव आणि त्यांच्या अनुभूती हे लिखाण पुष्कळ वैशिष्ट्यपूर्ण आहे; कारण प.पू. दास महाराज यांनी ते सर्व अनुभवलेले आहे अन् प्रतिकूल स्थितीत त्यांनी साधनेसाठी खडतर प्रयत्न केलेले आहेत आणि अजूनही करत आहेत. आपल्याला अशा संतांचे सान्निध्य लाभले आहे. ‘त्यांना नुसते तात्त्विक ज्ञान ठाऊक असून ते सांगत आहेत’, असे नसून त्यांनी स्वतः कृती केल्यामुळे हे त्यांच्या अनुभवातील ज्ञान आहे. अध्यात्मात कृतीला ९८ टक्के महत्त्व आहे. त्यामुळे आपल्यासाठी प.पू. दास महाराज यांचे लिखाण हे पुष्कळ महत्त्वाचे आहे. असे लिखाण आणि असे संत आपल्याला कुठेही मिळणार नाहीत. या ज्ञानाचा सर्वांना लाभ झाला पाहिजे. यांतून समष्टीला शिकता येईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. ध्यानावस्थेत असतांना रानडुक्कराने पाठीत सुळा खुपसल्याचीही जाणीव नसणारे प.पू. भगवानदास महाराज !
‘प.पू. भगवानदास महाराज (प.पू. दास महाराज यांचे वडील) एकदा ध्यानाला बसले की, ते त्या स्थितीतून २ – ३ दिवस उठत नसत. एकदा महाराज दाट झाडीत ध्यानासाठी बसले होते. तेव्हा त्यांच्या पाठीमागून एक मोठे रानडुक्कर आले आणि महाराजांच्या पाठीत टोकदार सुळे खुपसून पळून गेले. त्याही स्थितीत महाराज शांत आणि स्थिर राहून नामजपात मग्न होते. पाठीतून रक्त येऊन जखम झाली होती, तरी महाराजांच्या तोंडवळ्यावर काहीच त्रास जाणवत नव्हता.
२. जंगलात गेल्यावर रानडुक्करांच्या पिल्लांचा आवाज ऐकू येणे आणि महाराजांच्या पाठीमागून चालल्यामुळे त्यांच्या पाठीची जखम दिसणे
मी महाराजांसाठी दूध आणि फळे घेऊन जंगलात त्यांच्या उपासनेच्या ठिकाणी गेलो. महाराज बसले होते, त्या ठिकाणाच्या मागच्या बाजूने झाडीत काहीतरी आवाज येत होता. मी तो पहाण्यासाठी तिकडे गेलो, तर तिथे ओरडत असलेली रानडुक्कराची पिल्ले मला दिसली. मी परत येत असतांना माझे लक्ष महाराजांच्या पाठीवरील जखमेकडे गेले. तेव्हा मला कळले की, महाराजांच्या पाठीवर जखम होऊन त्यातून रक्तस्राव झाला होता. मी त्यांच्या पाठीमागून चालत आलो; म्हणून मला जखम दिसली. नाहीतर मला ती जखम झाल्याचे कळलेही नसते.
३. रानडुक्कराने पाठीत सुळा खुपसून जखम होऊनही विदेही स्थितीत असल्यामुळे त्या जखमेची जाणीवही नसणारे प.पू. भगवानदास महाराज !
महाराज ध्यानाच्या स्थितीतून जागे झाल्यावर मी त्यांना विचारले, ‘‘तुमच्या पाठीत जखम झाली आहे. ‘ती जखम होऊन ३ – ४ दिवस झाले आहेत’, असे मला वाटते आणि त्या जखमेतून पांढर्या बारीक अळ्या बाहेर पडत आहेत. तेथे रक्तस्रावही झाला आहे. महाराज, तुम्हाला याची जाणीव झाली नाही का ?’’ तेव्हा महाराज मला म्हणाले, ‘‘नाही बाळा ! मी ध्यानावस्थेत असतांना देहाला काहीही झाले, तरी मला त्याची जाणीव होत नाही. मी विदेही स्थितीत असतो.’’ तेव्हा मला कळले की, ‘ध्यानस्थ असतांना महाराज विदेही स्थितीत असतात.’
४. जखमेत गूळ भरणे आणि महाराजांचे आध्यात्मिक बळ यांमुळे जखम बरी होणे
त्यानंतर मी महाराजांना विचारले, ‘‘वैद्यांना बोलवायचे का ?’’ त्यावर महाराज म्हणाले, ‘‘नको, काही होणार नाही. केवळ पाठीवरच्या जखमेत गूळ आणून भर, म्हणजे बरे होईल.’’ प्रत्यक्षात त्या डुकराने महाराजांच्या पाठीत बरेच मोठे भोक पाडले होते. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मी त्या जखमेत गूळ भरला. त्यानंतर त्या जखमेतून भराभरा पांढर्या रंगाच्या अळ्या बाहेर पडू लागल्या. गूळ खाल्ल्यामुळे जखमेत झालेल्या अळ्या मरून पडायच्या. काही दिवस मी महाराजांच्या जखमेत गूळ भरला. या उपचाराने आणि महाराजांच्या आध्यात्मिक बळावर त्यांची जखम काही दिवसांनी पूर्णपणे बरी झाली.’
– आपला चरणसेवक दास,
प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.३.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या आणि साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |