आतंकवादी याकुब मेनन याच्या कबरीचे मुंबईत उदात्तीकरण !

पोलिसांनी दिवे काढले !

मुंबई – वर्ष १९९३ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटात २५७ जण ठार झाले होते. या प्रकरणातील प्रमुख आतंकवादी याकूब मेनन याला वर्ष २०१५ मध्ये नागपूर येथे फाशी दिल्यानंतर त्याला मुंबईत दफन करण्यात आले. त्याच्या कबरीची सजावट करून त्याचेे मजारीमध्ये रूपांतर करण्याचे कारस्थान ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने समोर आणले.

कोरोना महामारीच्या काळात दक्षिण मुंबई भागात मरिन लाईन्स येथे बडा कब्रस्तान परिसरात असलेल्या याकुबच्या कबरीला संगमरवरी कठडा करण्यात आला, तसेच या कबरीच्या भोवती अतिरिक्त बांधकाम करण्यात आले आहे. एल्.ई.डी. दिवेही या ठिकाणी लावण्यात आले. या ठिकाणच्या कबरीच्या भोवती ५-७ कबरी होतील इतकी जागा व्यापलेली आहे. कुठल्याही कबरीच्या ठिकाणी १८ मासांनंतर अन्य जणांना पुरले जाते. त्यामुळे कुठेही पक्के बांधकाम करण्याची अनुमती नाही. असे असूनही येथे पक्के बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे ‘एवढ्या वर्षांत येथे अन्य कुणाला पुरण्याविषयीचे सूत्र कसे पुढे आले नाही ?’, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. येथील एका व्यक्तीने अवैधरित्या ही जागा विकण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा आहे.

या संदर्भातील वृत्त ७ सप्टेंबरला प्रसारित झाल्यावर महानगरपालिका आणि पोलीस अधिकारी यांच्या पथकांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि या ठिकाणी संरक्षणही दिले आहे.

पोलिसांनी कबरीवरील दिवे काढले !

कबरीवरील एल्.ई.डी. दिवे आणि वरील हॅलोजन काढले, तसेच येथे वीजपुरवठा करणार्‍या ताराही पोलिसांनी काढून टाकल्या आहेत.

बडा कब्रस्तानवाल्यांचे स्पष्टीकरण !

येथे अनेक कबरींना संगमरवर लावण्यात आले आहे. याकूब याचे कुटुंबीय त्या जागेचे भाडे भरत असून त्याच्या अन्य कुटुंबियांनाही येथे दफन करण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण बडा कब्रस्तान येथील संबंधित व्यक्तींनी दिले आहे.

या प्रकरणी पुढील प्रश्‍न उपस्थित होत आहेत

१. कब्रस्तान प्रशासनाने याकूब मेनन याच्या कुटुंबियांना याकूबच्या कबरीची भूमी विकली आहे का ? अशा प्रकारे कबरस्तानची जागा कुणाला विकता येते का ?

२. एखाद्या कब्रस्तानात अशा प्रकारे एखादी कबर जर कायमस्वरूपी सुरक्षित केली जात असेल, तर त्याची अनुमती घेतली का ?

३. याकूब याची कबर नियमानुसार १८ मासांनी का खोदली नाही ?

४. तत्कालीन सरकारने याकूबच्या कबरीची विल्हेवाट लावण्याचा का निर्णय घेतला नाही ?

५. आतंकवादी याकूब मेनन याचे अशा प्रकारे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे का ?

संपादकीय भूमिका

  • महाराष्ट्राच्या राजधानीत अशी घटना घडणे, हे लज्जास्पद ! एवढे होईपर्यंत पोलीस आणि प्रशासन काय करत होते ?
  • या घटनेवरून मुंबईत आतंकवाद्यांचे किती मोठ्या प्रमाणात पाठीराखे आहेत, हे दिसून येते. ही स्थिती राजधानीच्या सुरक्षेसाठी धोकादायक !