प्रशासनाने श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयी कायदाबाह्य भूमिका न घेता सकारात्मक भूमिका घ्यावी ! – कौशिक मराठे, इचलकरंजी

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – हिंदु धर्म हा नेहमीच सुधारणा स्वीकारणारा राहिला आहे. जे प्रशासन प्रतिदिन होणार्‍या ध्वनीप्रदूषणाविषयी काही न करता कानाडोळा करून केवळ हिंदूंच्या वर्षभरातून एकदाच येणार्‍या गणेशोत्सवाच्या माध्यमातून अगदी प्रशासनाच्या म्हणण्याप्रमाणे ०.००१ टक्के (असे जे काही नगण्य असेल ते) होणारे प्रदूषणसुद्धा कोणताही कायदा आड येत नसतांनाही आणि स्वयंस्फूर्तीने पुढील काळात थांबवण्यासाठी प्रयत्न करायला सिद्ध आहे. त्यामुळे यंदा प्रशासनाने पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जन न करण्याविषयी सक्तीची कायदाबाह्य घेतलेली भूमिका न घेता सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन येथील राष्ट्रप्रेमी श्री. कौशिक मराठे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’शी बोलतांना केले.

श्री. मराठे पुढे म्हणाले की,

१. शहापूर खणीतील पाण्यात गटारीचे पाणी मिसळत असल्याने श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याची कल्पनाही भाविक करू शकत नाहीत.

२. ज्या श्री गणेशाची आपण मनोभावे पूजा करतो, त्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन हे योग्य प्रकारे भाविकांची भावना जपून करणे आवश्यक आहे.

३. ज्या घटकांमुळे प्रदूषण होते, ते घटक पुढील वर्षीपासून मूर्तीसाठी वापरण्यात येऊच नयेत, असे प्रयत्न पुढील काळात करणे आवश्यक आहे. त्या प्रदूषणकारी घटकांच्या वापराच्या बदल्यात नदीच्याच मातीची मूर्ती सिद्ध करता येईल. आता उत्सवाच्या मध्यात अचानक ‘श्री गणेशमूर्ती नदीत विसर्जन करताच येणार नाही’, अशी कायदाबाह्य मुस्कटदाबीची भूमिका घेतल्याने भाविकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

प्रशासनाने अट्टाहास करून अकारण भाविकांच्या भावना दुखावू नयेत, तर यातून कायदा नसतांनासुद्धा पालट स्वीकारण्यास सिद्ध असलेल्या लोकांसमवेत त्यांचा सहभाग घेऊन मार्ग काढला, तर निश्चित मार्ग निघेल आणि पुढील वर्षी जे नगण्य प्रदूषण असेल तेसुद्धा टाळता येईल. यासाठी सकारात्मक भूमिका हवी.