बिहारमध्ये सरकारी शाळेत ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; देहलीत तिसरीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

प्रतिकात्मक छायाचित्र

देहली/पाटणा – बिहार आणि देहली येथे सरकारी शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाच्या घटना समोर आल्या आहेत. बिहारच्या बेगुसरायमध्ये इयत्ता दुसरीच्या ७ वर्षांच्या मुलीवर शाळेतील सफाई कामगाराने बलात्कार केला. देहलीतील मधु विहार येथील एका शाळेत इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीवर दहावीच्या विद्यार्थ्याने बलात्कार केला.

१. एका वृत्तानुसार बिहारमधील बेगुसरायच्या झिरोमल पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या एका शाळेत शौचालयात सफाई कामगाराने ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. या घटनेविषयी कुणालाही न सांगण्याची धमकीही त्याने मुलीला दिली.

२. शाळेच्या २ शिक्षकांना या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी पीडित बालिकेला बिस्किटे खायला दिली आणि घरातील कुणालाही याविषयी न सांगण्याचा सल्ला दिला. (अशा शिक्षकांना तात्काळ बडतर्फ करून त्यांना कारागृहात डांबणे आवश्यक ! – संपादक) पीडित मुलीने शाळेत घडलेला सर्व प्रसंग कुटुंबियांना सांगितला.

३. शाळा प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे; मात्र स्थानिकांनी आवाज उठवल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून सफाई कर्मचार्‍याला अटक केली. यासोबत हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणार्‍या शाळेच्या मुख्याध्यापकांनाही अटक केल्याचे वृत्त आहे.

देहलीत दहावीच्या विद्यार्थ्याने केला तिसरीत शिकणार्‍या मुलीवर बलात्कार

देहलीतील शासकीय सर्वाेदय बाल विद्यालयात इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणार्‍या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी हा शाळेतील दहावीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी आहे. (सध्या मॅकॉले शिक्षणपद्धत अवलंबल्यामुळेच अशी नीतीहीन मुले निपजत आहेत. मुलांना साधना न शिकवणारे सर्वपक्षीय शासनकर्ते यास उत्तरदायी आहेत ! – संपादक) त्याला पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या ३७७ कलमाच्या अंतर्गत अटक केली आहे. याविषयी पुढील अन्वेषण चालू आहे.

संपादकीय भूमिका

समाजातील नैतिकता रसातळाला जात असल्याचे द्योतक !