यति नरसिंहानंद आणि जितेंद्र त्यागी (पूर्वीश्रमीचे वसीम रिझवी) यांच्या अटकेची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

त्यागी यांच्या ‘महंमद’ पुस्तकावरील बंदीची मागणीही फेटाळली !

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद, तसेच शिया सेंट्रल वफ्क बोर्डाचे माजी अध्यक्ष जितेंद्र त्यागी (पूर्वीश्रमीचे वसीम रिझवी) यांना अटक करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ‘भारतीय मुस्लिम शिया इस्ना आशारी जमात’ यांच्याकडून ही याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. यात त्यागी यांनी लिहिलेल्या ‘महंमद’ या पुस्तकावर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली होती; मात्र सरन्यायाधीश उदय लळीत आणि न्यायमूर्ती एस्.आर्. भट यांच्या खंडपिठाने राज्यघटनेच्या कलम ३२ नुसार ही याचिका फेटाळून लावली. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यागी यांची कुराणामधील २६ आयते (वाक्ये) हटवण्याची केलेली मागणी फेटाळून लावत यांना ५० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला होता.