श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी सर्वत्र गणरायाचे आगमन झाले. गेल्या २ वर्षांमध्ये कोरोना महामारीचे सावट असल्यामुळे कोणतेच उत्सव उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरे झाले नाहीत. या वर्षी गणरायाचे आगमन झाल्यानंतर लहान-मोठे, गरीब-श्रीमंत सर्वच जणांनी गणरायाचे स्वागत मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने केले. गणरायाच्या आगमनाची सिद्धता काही दिवसांपासूनच चालू झाली होती. यामध्ये रोषणाई, फुलांची सजावट, फळे, मोदक, मिठाई या आणि यांसारख्या अनेक गोष्टींची सिद्धता करतांनाही सर्वांमध्ये मोठा उत्साह जाणवत आहे.
गणेशचतुर्थीच्या दिवशी घरगुती, तसेच सार्वजनिक श्री गणेशमूर्तीची स्थापना झाल्यानंतर अनेकांच्या मुलाखती प्रसारमाध्यमांनी दाखवल्या. यामध्ये ‘सेलीब्रिटी’, राजकारणी आणि मध्यमवर्गीयांपासून ते मोठ्या गणेशोत्सव मंडळातील भक्त अन् कार्यकर्ते यांचा सहभाग होता. ‘गणरायासाठी काय करू आणि काय नको’, अशी सर्वांची स्थिती झाली होती. हिंदूंचे सण आणि उत्सव म्हटले की, आनंद, उत्साह आणि वातावरणात चैतन्य ओसंडून वहात असते. यामागील अध्यात्मशास्त्रीय कारण पाहिल्यास
श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी गणेशतत्त्व पृथ्वीवर अन्य दिवसांच्या तुलनेत सहस्र पटींनी कार्यरत असते. वातावरणात प्रक्षेपित होणारे गणेशतत्त्व आणि भक्तांचा भाव यांचा परिणाम म्हणून सर्वांना आनंद मिळतो.
श्री गणेशाचे आगमन होणार म्हटल्यावर सर्वांना प्रत्यक्ष श्री गणेशच येणार, असे वाटत असते. यामुळे सर्व सिद्धता त्या भावाने आणि त्या पद्धतीने केली जाते. येथे कुणालाही शंका नसते की खरंच श्री गणेश येणार का ? आपण त्याच्यासाठी हे सर्व करायला हवे का ? कारण अध्यात्मशास्त्रानुसार गणेशतत्त्व कार्यरत असते ते सर्वजण अनुभवतात. त्यामुळे श्री गणेश सूक्ष्मातून आलेले असले, तरी सर्वजण हे स्थूलातून अनुभवतात. ‘भाव तेथे देव’ या नियमानुसार प्रत्येकजण वातावरणातील दैवी चैतन्य अनुभवतो. गणेशोत्सवाविषयी विचार केल्यास श्री गणेशाच्या आगमनाने जो आनंद मिळतो, तो अवर्णनीय आहे. हा ‘आनंद घ्या’, असे कुणाला सांगावे लागत नाही किंवा उत्सव साजरा करा, असेही कुणाला सांगावे लागत नाही. यातून देवताच मनुष्याला अवर्णनीय आनंद देतात, हेच खरे !
– वैद्या (कु. (सुश्री)) माया पाटील, देवद आश्रम, पनवेल.