पुणे येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी दीडशे फिरते हौद !

पुणे – मागील २ वर्षे शहरात कोरोनाचा संसर्ग असल्याने विसर्जन घाटांवर नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी फिरत्या हौदांची व्यवस्था केली होती. यंदा मात्र कोरोनाची साथ आटोक्यात असतांना आणि नागरिकांकडून कोणतीही मागणी नसतांना महापालिकेने १५० फिरत्या हौदांची व्यवस्था केली आहे. याशिवाय क्षेत्रीय कार्यालयांच्या वतीनेही काही फिरत्या हौदांची व्यवस्था केली जाणार आहे. १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ४६ बांधलेले हौद, १७७ ठिकाणी ३५९ लोखंडी हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालयांनी सार्वजनिक स्वच्छता, कंटेनर, निर्माल्य कलश, कीटकनाशकांची फवारणी, विसर्जन घाटावर अग्नीशमनदल कर्मचारी; तसेच अन्य कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. पाचव्या दिवशीच्या विसर्जनासाठी फिरते हौद उपलब्ध होऊ शकतील, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त आशा राऊत यांनी दिली.

संपादकीय भूमिका

२ वर्षांपूर्वी फिरते हौद निर्मितीसाठी महापालिका प्रशासनाने कचरापेट्यांचा उपयोग केल्याचे उघडकीस आले होते. फिरत्या हौदांसारख्या अशास्त्रीय गोष्टींवर व्यय करण्यापेक्षा महापालिकेने भक्तांना वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जनास प्रोत्साहन दिल्यास श्री गणेशाची होणारी विटंबना रोखता येईल.