गोर्बाचेव्ह : शांतीदूत कि विघटनवादी ?

मिखाईल गोर्बाचेव्ह

सोव्हिएत संघाचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे ३० ऑगस्ट या दिवशी ९१ व्या वर्षी निधन झाले. डिसेंबर १९९१ मध्ये सोव्हिएत संघाचे विघटन झाले. रशियातील बहुतांश राष्ट्रवादी जनता या विघटनाला गोर्बाचेव्ह यांना उत्तरदायी ठरवून त्यांच्या नावाने आजही बोटे मोडते. रशियाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी तर गोर्बाचेव्ह यांच्यावर उघडउघड टीका केली होती. गोर्बाचेव्ह यांना ‘अमेरिका आणि सोव्हिएत संघ यांच्यातील शीतयुद्धाला पूर्णविराम देणारे नेते’ म्हणून जागतिक स्तरावर ओळख मिळाली. हे शीतयुद्ध कोणताही रक्तपात न होता संपुष्टात आले; म्हणून त्यांना नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ज्या गोर्बाचेव्ह यांना पाश्चात्त्य जग ‘शांतीदूत’ म्हणून गौरवते, तीच व्यक्ती रशियामध्ये मात्र ‘घरभेदी’ म्हणून ओळखली जाते. वर्ष १९९६ मध्ये गोर्बाचेव्ह हे रशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरीस येल्सिन यांच्या विरोधात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहिले. त्या वेळी त्यांना केवळ ०.५ टक्के मते मिळाली. ‘ही टक्केवारी त्यांच्या विरोधात रशियातील लोकांच्या मनात किती रोष होता’, हे सांगण्यास पुरेशी आहे. ८० आणि ९० च्या दशकांत आंतरराष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकणार्‍या राजकीय नेत्यांमध्ये गोर्बाचेव्ह यांचा समावेश आहे; मात्र ‘त्यांच्या नेतृत्वाचा रशियाच्या जनतेला किती लाभ झाला ?’, याविषयी मतमतांतरे असू शकतात. एखाद्या देशातील राजकारण्याने राष्ट्रीय सीमा भेदून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवणे, हे तसे कठीण काम. गोर्बाचेव्ह यांनी ते साध्य केले. ‘सुधारणावादी’, ‘संवेदनशील’, ‘शांततेचे पुरस्कर्ते’ आदी विविध बिरुदे त्यांना प्राप्त झाली, जगातील कानाकोपर्‍यातून त्यांना प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कारही मिळाले; मात्र रशियाच्या जनतेचे प्रेम त्यांना मिळू शकले नाही. ही त्यांच्या आयुष्यातील दुखरी नस म्हणावी लागेल. गोर्बाचेव्ह यांची मर्मस्थळे आणि शक्तीस्थळे अभ्यासून किंवा त्यांच्या कर्तृत्वाचा हिशोब मांडून त्यांचे पुण्यस्मरण करणे, यासाठी हा लेखप्रपंच नाही. कोणत्याही राष्ट्राचा नेता जेव्हा सत्तेची सूत्रे खाली ठेवतो, तेव्हा ‘आंतरराष्ट्रीय राजकारणात त्यांनी किती प्रमाणात ठसा उमटवला ?’, हे न पहाता ‘त्यांनी राष्ट्राच्या उत्कर्षासाठी काय केले ?’, यावर त्यांच्या नेतृत्वाच्या यशापयशाचे मोजमापन केले जाते. हा निकष गोर्बाचेव्ह यांच्या कारकीर्दीचे यशापयश पडताळण्यासाठी लावल्यास ‘रशियातील जनतेने नाकारलेले नेते’ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाईल. या दृष्टीकोनातून त्यांचे नेतृत्व अभ्यासायला हवे.

सोव्हिएतचे विघटन रोखण्यास अपयश !

‘गोर्बाचेव्ह यांच्यामुळे सोव्हिएत संघाचे विघटन झाले का ?’, या प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत. जगभरातील बहुतांश साम्यवादी सत्तेत असलेल्या देशांचा कारभार हुकूमशाही पद्धतीने चालला. चीनने सरकारच्या विरोधातील लोकांचा उद्रेक बळाचा वापर करून चिरडला, हा इतिहास आहे. गोर्बाचेव्ह हे मात्र संवेदनशील नेते होते. सोव्हिएत संघात रशियाची दादागिरी चालायची. या साम्यवादी दादागिरीखाली पिचलेल्या लॅटविया, लिथुआनिया, इस्टोनिया या संघराज्यांमधील लोकांचा उद्रेक वाढला. या उद्रेकाची लाट जॉर्जिया आणि युक्रेन येथेही पसरली. गोर्बाचेव्ह हे तरुणपणी साम्यवादी संस्कारात वाढलेले; मात्र एकाधिकारशाही गाजवण्याची ‘साम्यवादी’ वृत्ती त्यांच्यात नव्हती. त्यांचा मूळ पिंड हा समाजवादी होता. त्यामुळे स्वतंत्र देशाच्या मागणीसाठी विविध संघराज्यांत चालू असलेली आंदोलने त्यांनी चालू दिली. जशी सोव्हिएतची शकले होण्यासाठी काही संघटना आणि लोक कार्यरत होते, तसेच ‘सोव्हिएत एकसंध रहावा’, अशी मागणी किंवा इच्छा असणार्‍या राष्ट्रवादी लोकांची संख्याही बर्‍यापैकी होती. त्यामुळेच गोर्बाचेव्ह यांचे ‘गप्प’ रहाणे त्यांना खुपले. जनतेने भविष्यात यासाठी त्यांना कधीही क्षमा केली नाही.

गोर्बाचेव्ह यांनी जरी लोकांची आंदोलने चिरडली असती, तर आज ना उद्या सोव्हिएत संघाची शकले पडलीच असती; कारण जनता हुकूमशाही नेहमीच झिडकारते, हाच इतिहास आहे. गोर्बाचेव्ह यांच्या सौम्य धोरणांमुळेच सोव्हिएत संघाचे विघटन लवकर झाले एवढेच.

‘शांतीदूत’ : त्यांचे आणि आमचे !

देशाची फाळणी होणे, हे राष्ट्रवादी देशवासियांना रुचत नाही. गांधी यांच्या हट्टी आणि दुराग्रही स्वभावामुळे भारताची वर्ष १९४७ मध्ये फाळणी झाली. त्याच्या जखमा अजूनही भारतातील हिंदूंच्या मनात  ताज्या आहेत. सोव्हिएत संघाच्या फाळणीनंतर गोर्बाचेव्ह यांची राजकीय कारकीर्द तेथील जनतेने संपवली. भारतात मात्र फाळणीसाठी उत्तरदायी असलेल्या काँग्रेसला भारतियांनी डोक्यावर घेतले. गांधी यांचे पुतळे जागोजागी उभारून त्यांना ‘राष्ट्रपिता’ आदी संबोधून त्यांचा सन्मान केला गेला. रशिया आणि भारतीय समाज यांच्या मानसिकतेतील हा भेदही गोर्बाचेव्ह यांच्या गुण-दोषांचे विश्लेषण करतांना येथे मुद्दामहून अधोरेखित करावासा वाटतो.

हुकूमशहा होणे सोपे असते; मात्र लोकनेता होणे कठीण. गोर्बाचेव्ह यांचे दुर्दैव हेच की, ते साम्यवादी राजवटीत धड ना हुकूमशहा होऊ शकले, ना लोकनेते ! एक चांगला नेता होण्यासाठी आवश्यक असलेले अनेक गुण गोर्बाचेव्ह यांच्यातही होते. त्यांनी सोव्हिएतची विसकटलेली आर्थिक घडी बसवण्याचा प्रयत्न केला. हे सर्व करतांना ‘जनतेची राष्ट्रभावना ही अतिशय संवेदनशील गोष्ट असते. त्याला हात लावून चालत नाही’, हे गोर्बाचेव्ह विसरले. पुढील इतिहास आपल्यासमोर आहे.

देशाचे नेतृत्व करणार्‍यांमध्ये अनेक गुण असले; मात्र त्यांनी जनतेच्या राष्ट्रीय भावनांकडे दुर्लक्ष केले, तर आज ना उद्या त्यांची गोर्बाचेव्ह यांच्यासारखी स्थिती व्हायला वेळ लागत नाही. हिंदूंच्या धार्मिक आणि राष्ट्रीय भावनांकडे कानाडोळा करणार्‍या भारतातील धर्मनिरपेक्ष राजकारण्यांनी याकडे लक्ष द्यावे !