उत्तरप्रदेश भाजप सरकार राज्यातील मान्यता प्राप्त नसलेल्या सर्व मदरशांचे सर्वेक्षण करणार !

प्रतीकात्मक छायाचित्र

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने राज्यातील मान्यताप्राप्त नसलेल्या सर्व मदरशांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वेक्षणाद्वारे मूलभूत सुविधेची स्थिती पडताळण्यात येणार आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या निर्देशानुसार सरकारने हा निर्णय घेतल्याचे राज्याचे अल्पसंख्यांक कल्याण राज्यमंत्री दानिश आझाद अन्सारी यांनी सांगितले. उत्तरप्रदेशमध्ये सध्या १६ सहस्र ४६१ मदरसे आहेत. यातील केवळ ५६० मदरशांना सरकारी अनुदान दिले जाते.

‘या सर्वेक्षणानंतर त्यांना मान्यता देण्यात येणार आहे का ?’, या प्रश्‍नावर अन्सारी म्हणाले की, सध्या तरी आमचा उद्देश मूलभूत सुविधांची केवळ माहिती गोळा करणे इतकेच आहे.

सर्वेक्षणामध्ये काय विचारले जाणार ?

अन्सारी यांनी सांगितले की, सर्वेक्षणामध्ये मदरशाचे नाव, त्यांचे संचालन करणार्‍या संस्थेचे नाव, मदरसा खासगी किंवा भाड्याच्या ठिकाणी चालवण्यात येत आहे, याची माहिती; विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षकांची संख्या, मदरशाचा अभ्यासक्रम, मदरशाच्या उत्पन्नाचे स्रोत, पाण्याची व्यवस्था, वीज, शौचालय यांची स्थिती आदींची माहिती गोळा करण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

मदरशांतून जिहादी आतंकवादी कारवाया, लव्ह जिहाद, कट्टरतावादाचा प्रसार, लैंगिक शोषण आदी गुन्हेगारी कारवाया पहाता संपूर्ण देशातील मदरशांचे असे सर्वेक्षण करून त्यांच्यावर चाप लावणे किंवा त्यांना टाळे ठोकणेच आवश्यक !