या वर्षीचा गणेशोत्सव दारू आणि प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार !

पुणे येथील मानाच्या गणेशोत्सव मंडळांनी केली ‘मोरया कार्यकर्ता मंच’ची स्थापना

पुणे – स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून यंदाचा गणेशोत्सव दारू आणि प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार पुण्यातील मानाच्या गणेशोत्सव मंडळांनी केला आहे, तसेच ‘मोरया कार्यकर्ता मंच’ या व्यासपिठाची स्थापना केली असून मंचाच्या माध्यमातून कार्यकर्ते शहरातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी विधायक सहयोग देतील. या कार्यक्रमाला कसबा गणपति मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आणि ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’चे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी मानाच्या ५ गणपति मंडळांचे पदाधिकारीही उपस्थित होते.

१. शहरातील सर्व मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवण्यावर भर द्यावा.

२. ‘मोरया कार्यकर्ता मंच’ वाहतूक कोंडी, नदी सुधारणा, असे शहरातील महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करेल, असे शेटे यांनी सांगितले.

पुढच्या वर्षी गणेशोत्सवापूर्वी प्रत्येक गणेश मंडळाच्या मूर्तीची प्रतिकृती काश्मीरमध्ये पाठवणार आहे. तेथेही दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे, या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. अशी माहिती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’चे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी दिली.