गणेशोत्सवात कुटुंबभावना दृढ करूया !

कोकणातील गणेशोत्सवाचे विशेष महत्त्व !

गेली २ वर्षे कोरोनाच्या सावटाखाली गेल्यामुळे पुन्हा एकदा समस्त गणेशभक्त श्री गणेशाच्या आगमनाची आतुरतेने वाट पहात आहेत. सर्व आबालवृद्धांसाठीचा हा आनंदाचा क्षण समीप आल्याने सर्वत्र भक्तीभावाचे वातावरण पहायला मिळत आहे. सर्वांनाच गणेशोत्सव विशेष प्रिय आहे. असे असले, तरी कोकणातील गणेशोत्सवाचे महत्त्व विशेष आहे ! कोकणात गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईपासून सर्वदूर असलेले नातेवाईक एकत्र येतात आणि मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात. शहरी भागांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात असले, तरी कोकणात मात्र घरोघरी होणारा हा उत्सव निराळाच ! या निमित्ताने हिंदूंच्या संघटितपणाचा एक अविष्कार पहायला मिळतो, ज्यामुळे समाज एकसंध रहाण्यास साहाय्य होते. या काळात भाविक त्यांच्या घरातील पूजा आणि आरती झाल्यावर घरोघरी आरती करण्यासाठी जातात. यात टाळ, मृदंग घेऊन तल्लीन होऊन आरत्या केल्या जातात ! अनेक घरात रात्रभर भजनेही म्हटली जातात.

येथील श्री गणेशमूर्तीही जवळपास पारंपरिक स्वरूपातीलच असतात. आगमन आणि विसर्जन मिरवणुकाही आदर्शच असतात. पारंपरिक वेशात, लेझीम खेळत, गुलाल उधळत, टाळांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. कोकणात ग्रामीण भागात जवळपास प्रत्येक घरी श्री गणेशाची स्थापना केली जाते आणि ‘आरती चुकवायचीच नाही’, असा अलिखित नियम प्रत्येकजण पाळतो. श्री गणेशाच्या आरतीसमवेत श्रीकृष्ण, शंकर, श्री विठ्ठल, श्रीमहालक्ष्मी, तसेच स्थानिक संतांच्या आरत्याही म्हटल्या जातात. आरतीसाठी विशेषतः लहान मुलांचा उत्साह उल्लेखनीय असतो. आरतीसाठी जवळपास संपूर्ण वाडीच उपस्थित रहात असल्याने साहजिकच एकोपा आणि कुटुंबभावना निर्माण होण्यास साहाय्य होते. एखाद्याच्या घरी कर्ता पुरुष नसेल, तर आजूबाजूचे तरुण युवक तेथील घरात श्री गणेशमूर्ती आणण्यापासून विसर्जनापर्यंत सर्व बाजू सांभाळतात.

लोकमान्य टिळक यांनी हिंदूंच्या संघटितपणाचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून उत्सव चालू केला. हा उद्देश कोकणातील कौटुंबिक गणेशोत्सवातून पहायला मिळत आहे; परंतु अन्य ठिकाणी मात्र याचा अभाव जाणवतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वत्रच्या हिंदूंमध्ये कुटुंबभावना वाढीस लोगो, हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना !

– श्री. अजय केळकर, कोल्हापूर