प्रभात झाली हे गुरुनाथा, या हो मम मंदिरी ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी मला टप्याटप्प्याने साधना शिकवून माझी आध्यात्मिक प्रगती करवून घेतली. ते मला सुख-दुःखाच्या भयंकर भवसागरातून आनंदसागरात घेऊन जात आहेत. त्यांनी मला माझी स्थिती, काळ आणि आवश्यकता यांनुसार नामजप करायला सांगितला. तोच माझ्यासाठी गुरुमंत्र होता, उदा. आरंभी कुलदेवतेचे नाम, त्रासासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप, काळानुसार विशिष्ट देवतांचा आणि त्यानंतर ‘निर्विचार’ हा नामजप. परात्पर गुरु डॉक्टरच मला अस्थिरतेकडून स्थिरतेकडे, मनातील विचारांच्या गोंधळाकडून निर्विचार अवस्थेकडे आणि आनंद अन् शांती यांकडे घेऊन जात आहेत. ‘ते सच्चिदानंद परब्रह्मच आहेत’, याची मला सतत अनुभूती येत रहाते. आज रामप्रहरी मला साक्षात् श्रीरामस्वरूप गुरुदेवांचे गुरुस्मरण झाले आणि पुढील भूपाळीरूपी कृतज्ञतापुष्प त्यांच्या चरणी अर्पण झाले.

पू. शिवाजी वटकर

प्रभात झाली हे गुरुनाथा (टीप १), या हो मम मंदिरी ।

गुरुमंत्राचा (टीप २) घोषची घुमत रहावा,

माझ्या अंतरी ।। १ ।।

रामकृष्ण तुम्ही, विष्णुस्वरूप तुम्ही, तुम्ही ज्ञानदेव (टीप ३) ।

करुणाकर तुम्ही, कृपावंत तुम्ही, तुम्ही वासुदेव ।। २ ।।

माझे माझे लोप पावूदे, तुमचे चैतन्य विलसू दे ।

कोण असे मी, तुमच्या चरणांची धूळ होऊ दे ।। ३ ।।

प्रसन्नतेची प्रभा सदोदित, झळको वदनावरी ।

‘जय गुरुदेव’ घोषची घुमत रहावा, माझ्या अंतरी ।। ४ ।।

अहं जाऊ दे, मनोलय होऊ दे, आशीर्वाद हवा ।

गुरुभक्तीचा, तुमच्या प्रीतीचा, छंद जडू दे जिवा ।। ५ ।।

सुमने सु-मने अर्पण व्हावी, कृपा करा सत्वरी ।

प्रार्थनेचा घोषची घुमत रहावा, माझ्या मन मंदिरी ।। ६ ।।

उदात्त उन्नत पावन जीवन, हे व्हावे ।

गुरुदेवांचे स्मरण करता करता ‘मी’पण संपावे ।। ७ ।।

चरणी घेऊनी शिकवा साधना, ओढ ही लागली ।

चैतन्याचे घास सानुले, आम्हा भरवा गुरुमाऊली ।। ८ ।।

चित्ती वचनी कृतीत यावी, आपली शिकवण सारी ।

गुरुस्मरणांचा घोषची घुमत रहावा, मानस गाभारी ।। ९ ।।

द्वंद न उरले, दुःख संपले अनुभव हा यावा ।

तिमिर मावळे गगन उजळले, जाणवतो गारवा ।। १० ।।

स्वागत करितो सद्गुरुराया, उमलू दे मनी उषा ।

गुरुकृपा प्रसादे आपुल्या, शमू दे सगळी तृषा ।। ११ ।।

साधकवृंद हा प्रसन्न वदने, विनम्र वंदन करी ।

गुरुदेवांचा कृपाशीर्वाद रहावा, सदैव आमुच्या शिरी ।। १२ ।।

गुरुमय होऊनी आम्हा जाणवो, गुरुमय सृष्टी सारी ।

कृतज्ञतेचा घोषची घुमत रहावा, माझ्या मन मंदिरी ।। १३ ।।

टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले

टीप २ – साधकांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेला नामजप

टीप ३ – मानवाच्या कल्याणासाठी पाचवा वेद असणार्‍या ग्रंथाची निर्मिती करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले.

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल, (११.३.२०२२)