पिंपरी – महाराष्ट्र राज्य विद्युत् महामंडळाच्या पुण्यातील मुख्य कार्यालयामध्ये ‘एन्.एस्.सी.’ (न्यू सर्व्हिस कनेक्शन) योजनेच्या अंतर्गत पैसे भरूनही ग्राहकांना वेळेवर वीजमीटर दिले जात नाहीत. वीज जोडणीकरता ४-४ मास वाट पहावी लागत आहे. वीज नियामक आयोगाने संबंधित गोष्टींचा अहवाल मागवून घ्यावा. अशा दायित्व नाकारणार्या अधिकार्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शिवसेना शहर संघटक तथा ‘पुणे जिल्हा संनियंत्रण समिती’चे सदस्य संतोष सौंदणकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? विद्युत् महामंडळाच्या प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? – संपादक)
ग्राहकांच्या सोयीकरता विविध योजना घोषित केल्या जातात; परंतु त्यांची कार्यवाही प्रभावीपणे होतांना दिसून येत नाही. वीजजोडणीची रक्कम भरल्यानंतर एका मासामध्ये संबंधितांना वीजजोडणी देणे बंधनकारक असतांना महावितरण प्रशासन मात्र त्याकडे डोळेझाक करत आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे ग्राहकांना वेळेवर सेवा मिळत नाहीत, अशा अनेक तक्रारी येत आहेत, असेही सौंदणकर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये उल्लेख केला आहे.
संपादकीय भूमिकानवीन वीजजोडणी देण्यामध्ये ‘महावितरण’चा गलथान कारभार असेल, तर ग्राहकाला दैनंदिन सेवा देण्यात किती असेल ? |