पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात दौर्‍यापूर्वी भूजमध्ये दोन गटांत हाणामारी

भूज (गुजरात) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून २ दिवसांच्या गुजरात दौर्‍यावर आहेत. त्यांच्या दौर्‍यापूर्वी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील भूजमध्ये धार्मिक संघर्ष उफाळून आला आहे. भूजमध्ये एका स्थानिक व्यक्तीची हत्या करण्यात आल्याने २ गटांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार भूजमधील माधापूर भागात दूध विकणार्‍या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच संतप्त जमावाने रस्त्यावर उतरून मशीद आणि दुकाने यांची तोडफोड केली. माधापूर येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांसह मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.