नाशिकच्या आदिवासी विभागातील लाचखोर अधिकार्‍याच्या घरातून दीड कोटी रुपये हस्तगत !

पुणे – आदिवासी विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांच्या नाशिकच्या घरातून ९८ लाख ६३ सहस्र, तर पुणे येथील घरातून ४५ लाख ४० सहस्र रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. नाशिक आणि पुणे अशा दोन्ही ठिकाणांहून १ कोटी ४४ लाख रुपयांची रोख रक्कम सापडली आहे, तसेच अद्यापही बागुल यांच्या अनेक घरांत झाडाझडती चालू असून पैसे मोजण्यासाठी यंत्राचा वापर केला जात आहे. ‘एका कार्यकारी अभियंत्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने त्याने कोणकोणत्या प्रकरणात पैसे घेतले’, याचेही अन्वेषण केले जाणार आहे. बागुल यांनी रोकड, सोने, बेनामी संपत्ती असे कोट्यवधी रुपयांचे धन जमवल्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संशय आहे.

काय आहे प्रकरण ?

बागुल यांनी दीड कोटी रुपयांचे ‘सेंट्रल किचन’चे देयक मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडे रकमेच्या १२ टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती. ठेकेदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बागुल यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पथकाने २५ ऑगस्ट या दिवशी २८ लाख रुपये लाच घेतांना बागुल यांना अटक केली. नाशिकच्या आदिवासी विभागात कोट्यवधी रुपयांच्या देयकांच्या धारिका पडून असतात. नाशिकचे आदिवासी विकासभवन हे केवळ नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र यासाठी नसून संपूर्ण राज्याचे आहे. येथून राज्यातील आदिवासी विकास विभागाचे कामकाज चालवले जाते. (प्रशासनात ग्रामसेवकापासून उच्चपदस्थ अधिकार्‍यांपर्यंत भ्रष्टाचार मुरला आहे. साधी कामे करण्यासाठी जनतेकडून लाच घेतली जाते, हे गंभीर आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांत एकही राजकीय पक्ष देश भ्रष्टाचारमुक्त करू शकलेला नाही. त्यामुळे भ्रष्टाचार करणार्‍यांएवढेच तो न रोखणारे राज्यकर्तेही दोषीच म्हणावे लागतील. – संपादक)

संपादकीय भूमिका

एका भ्रष्ट अधिकार्‍याकडे एवढी रक्कम मिळते, तर प्रशासनातील अन्य भ्रष्ट अधिकारी-कर्मचार्‍यांकडे किती रक्कम असेल, याचा विचारही न केलेला बरा !