‘सी.बी.एस्.ई.’ अभ्यासक्रमात सातवीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केवळ एकच धडा !

पुणे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सी.बी.एस्.ई.) कोणत्याच वर्गाच्या पाठ्यपुस्तकात वर्ष २०१६ च्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एकही शब्द नव्हता. त्याविषयी पालकांमधून मागणी झाल्यानंतर तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याविषयी ‘सी.बी.एस्.ई.’च्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणार्‍या एन्.सी.ई.आर्.टी. (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था)कडे पाठपुरावा केला. त्यानंतर सी.बी.एस्.ई. अभ्यासक्रमात इयत्ता सातवीत ‘मराठा साम्राज्य’ हा धडा समाविष्ट करण्यात आला. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसह संपूर्ण मराठा साम्राज्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला गेला असल्याने महाराजांच्या जाज्ज्वल्य पराक्रमाविषयी तोकडी माहिती मिळते. नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळत नाही. (मराठा साम्राज्यासह छत्रपती शिवरायांचा इतिहास  एका धड्यामध्ये संपवणार्‍या एन्.सी.ई.आर्.टी.ने नेहमीच अभ्यासक्रमाविषयी हिंदुविरोधी भूमिका घेतली आहे. – संपादक)    

‘पुढे हळूहळू हा इतिहास अधिक व्यापक करू’, अशी ग्वाही तत्कालीन शिक्षणमंत्र्यांनी दिली होती; मात्र नंतर ३ वेळा सरकार पालटले तरी एन्.सी.ई.आर्.टी.कडून अभ्यासक्रम पालटला नाही. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक आणि अभ्यासक्रम मंडळाने शालेय अभ्यासक्रमात इयत्ता चौथीच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अवघे पुस्तकच समाविष्ट केलेले असतांना सी.बी.एस्.ई. मंडळाने मात्र त्यांच्यावर इयत्ता सातवीच्या पुस्तकात केवळ एक धडा दिला आहे, तर ‘आय.सी.एस्.ई.’मध्येही सहावीच्या पुस्तकात एकच धडा आहे. (एन्.सी.ई.आर्.टी.ने मोगलांच्या प्रत्येक बादशहाचे महिमामंडन केले आहे, तसेच स्वदेशींपेक्षा विदेशींचा इतिहास माथी मारला आहे. इतिहासद्रोही एन्.सी.ई.आर्.टी.चे विसर्जन करून राष्ट्रहित पहाणारी संस्था स्थापन करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार का ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

छत्रपती शिवाजी महाराजांना दुय्यम स्थान देणारे अभ्यासक्रम नकोत, असा पवित्रा पालकांनी घेऊन याविषयी वैधमार्गाने लढा द्यायला हवा !