मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे एका हिंदु शिंप्याला कन्हैयालाल यांच्याप्रमाणेच ठार मारण्याची धमकी

नरेंद्रकुमार सैनी यांच्याशी चर्चा करतांना पोलीस अधिकारी

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील शामली मार्गावरील गोशाला बाजारातील नरेंद्रकुमार सैनी नावाच्या शिंप्याला (शिवणकाम करणार्‍याला) त्याच्या दुकानामध्ये एक पत्र पाठवण्यात आले आहे. यात, ‘तू मोठा देशभक्त बनतो आहेस. नूपुर शर्मा तर एक कारण आहे, कन्हैयालाल प्रमाणेच तू आमचे लक्ष्य असणार आहेस. तू वाचणार नाहीस. पळता येईल, तेवढे पळ’, अशी धमकी देण्यात आली आहे.

यानंतर पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या धमकीमुळे सैनी आणि अन्य हिंदु दुकानदार यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सैनी कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा कोणत्याही संघटनेशी संबंधित नाहीत. तसेच त्यांनी नूपुर शर्मा यांच्या प्रकरणी सामाजिक माध्यमांतून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यामुळे ‘त्यांना धमकी का देण्यात आली ?’, हे समजलेले नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की, हा कुणीतरी खोडसाळपणा केल्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे शोध घेतला जात आहे.